![]()
देहू येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. १५) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. पुष्पा सुरेश गाडे (रा. चव्हाणनगर, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६.४५ वाजता माणिक जाधव या नागरिकाने नियंत्रण कक्षाला फोन करून एका महिलेने नदीत उडी मारल्याची माहिती दिली. माहिती मिळताच देहूगाव बीट मार्शलचे पोलीस शिपाई भोये आणि सुरवसे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी पीएमआरडीएच्या मारुंजी येथील ‘पीडीआरएफ’ पथकाला पाचारण केले. ‘पीडीआरएफ’चे जवान आणि स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे काही वेळातच संबंधित महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नदीबाहेर काढल्यानंतर महिला अर्धवट शुद्धीत होती. जवान आणि पोलिसांनी वेळ न दवडता खाजगी रुग्णवाहिकेने तिला तात्काळ ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे महिला शुद्धीवर आली असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती महिलेचे पती सुरेश केशव गाडे आणि भाऊ राजेंद्र गायकवाड यांना दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विवाहितेला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Source link
इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या विवाहितेचे वाचले प्राण:देहू येथे पीएमआरडीएच्या ‘पीडीआरएफ’ पथकाने वाचवले, उपचार सुरू