![]()
थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर यांनी ही माहिती दिली आहे. हा पुरस्कार सोमवार, २२ जून २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पुण्यात नवी पेठ येथील एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात प्रदान केला जाईल. भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी विचारवंत डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झीशान अय्युब यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, संशोधन, पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यांसारख्या क्षेत्रांमधील राष्ट्रीय पातळीवरील योगदान आणि भविष्यात त्या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. झीशान अय्युब यांनी किरोरी मल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून रंगभूमीचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात राजकुमार गुप्ता यांच्या ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने केली. जेसिका लाल यांच्या खुनाच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटातील मनु शर्मा या पात्रावर आधारित त्यांची भूमिका खूप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेते’ म्हणून ‘फिल्मफेअर’ पारितोषिकाचे आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ म्हणून झी सिने अवॉर्ड्सचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर त्यांनी ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’, ‘जन्नत’, ‘रांझणा’, ‘शहीद’, ‘रईस’ आणि ‘आर्टिकल १५’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत किमान ३५ चित्रपट आणि १० मालिकांमध्ये काम केले आहे. झीशान अय्युब हे समकालीन भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीतील एक आदरणीय आणि बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभिनयातील खोली, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलतेमुळे त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
Source link
अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान