![]()
सोमवती अमावास्येच्या पावन पर्वानिमित्त खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळला. रविवार व सोमवार अशा दोन दिवसांत देशाच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे १ लाख भाविकांनी निद्रिस्त अवस्थेतील मारुतीरायाचे दर्शन घेतले. यंदा सोमवती अमावास्या अधिकमास (पुरुषोत्तम मास) या अत्यंत शुभ योगासह आल्याने या दर्शनाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले होते. यंदाच्या सोमवती अमावास्येचा कालावधी तब्बल २१ तासांचा होता. रविवार, १४ जून रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अमावास्येला प्रारंभ झाला आणि सोमवारी १५ जून सकाळी साडेआठ वाजता ती समाप्त झाली. या संपूर्ण कालावधीत भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. मंदिराचे जनसंपर्क राजेंद्र जोंधळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रविवार दुपारी १२.२० ते रात्री साडेदहा, सोमवार पहाटे ४ ते सकाळी ८.३० या कालावधीत जवळपास १ लाख भाविकांनी श्री भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मागील वर्षांप्रमाणे यंदाही भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसून आली.’ नाथ संस्थान अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात या धोंड्याच्या महिन्यात दररोज हजारो भक्त वारकरी आले. यांच्या दर्शनाचे योग्य नियोजन करण्यासाठी नाथ संस्थानच्या वतीने विशेष टीम या दर्शनासाठी लावण्यात आली होती. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दररोज तीन हजारांहून अधिक भाविकांच्या सुविधेसाठी नियोजन केले. यात भाविकांना दररोज दर्शन रांगांमध्ये थंड पाणी, उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी सावलीचे नियोजन केले. भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतून हजारो भाविक खुलताबादमध्ये दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, धुळे, जळगाव आणि सांगली या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर भक्तांनी उपस्थिती लावली. भाविकांनी कुटुंबासह दर्शनासाठी येत अमावास्येचा पुण्यलाभ घेतला. मंदिर संस्थानने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात थंड पाण्याचे फवारे बसवले आहेत. तसेच भव्य एसी सभामंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली. पैठण | येथील संत एकनाथ महाराजांच्या धोंडे उत्सवाचा सोमवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने नाथ मंदिरात गर्दी केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. मंदिर परिसरापासून शहरातील प्रमुख मार्गांवर तब्बल एक किलोमीटरपर्यंत रांगा होत्या. यात आजचा शेवटचा दिवस असल्याने पन्नास हजारांहून अधिक महिलांनी गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान केले, अशी माहिती नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, नाथसेवक शहादेव लोहारे यांनी दिली. गेल्या एक महिन्यात राज्यासह परराज्यातूनही २५ लाखांहून अधिक भाविक पैठणमध्ये दाखल होऊन धोंडे उत्सवानिमित्त संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आणि गोदावरी स्नान करण्यासाठी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली. भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘एकनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दर्शन रांगांमध्ये थंड पाणी, आरोग्य सुविधा उन्हाच्या तीव्रतेवर मात; भव्य एसी सभामंडप महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरातच्या भाविकांची उपस्थिती
Source link
श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक:सोमवती अमावास्या, अधिक मास एकत्र आल्याने भाविकांची गर्दी; पहाटे 4 पासून घेतले दर्शन