Headlines

कृषी विद्यापीठ अन् बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात सामंजस्य करार:हळद संशोधन, प्रशिक्षण आणि प्रक्रियेला गती मिळणार




राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत (जि. हिंगोली) यांच्यात मंगळवारी ता. १६ सामंजस्य करार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्रा सोबतच विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे. परभणी येथे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी, संचालक संशोधन डॉ. श्री खिजर बेग आणि हरिद्रा संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठ व हळद केंद्रातील अधिकारी उपस्थित होते. या करारासाठी केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांना पुढाकार घेतला आहे. यावेळी झालेल्या या तीन वर्षांच्या दीर्घकालीन करारामुळे दोन्ही संस्थांमधील वैज्ञानिक कौशल्य, प्रयोगशाळा आणि संशोधन साधनांची देवाणघेवाण होणार आहे. प्रामुख्याने खालील क्षेत्रांवर संयुक्तपणे काम केले जाईल. हळद पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनोटेंक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादकता वाढवणे. हळदीवरील प्रमुख रोग व किडींचे निदान करून जैविक नियंत्रण आणि एकात्मिक व्यवस्थापन पद्धती विकसित केले जाणार आहे. या शिवाय हळदीमधील करकुमीन चे प्रमाण वाढवणे, रेसिड्यू-फ्री हळद उत्पादनाला चालना देणे आणि औषधी, सौंदर्यप्रसाधने व अन्न प्रक्रियेसाठी नवीन उत्पादने तयार करण्याचे काम केले जाणार आहे. या सोबतच कृषी विद्यापीठाचे पदव्युत्तर व पीएचडीचे विद्यार्थी हरिद्रा केंद्राच्या प्रयोगशाळांमध्ये संशोधन करू शकतील. तसेच शेतकरी व प्रक्रिया उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रम राबवले जातील. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल – कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी या करारामुळे विद्यापीठाचे संशोधन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि प्रक्रिया उद्योगांपर्यंत पोहोचेल. उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल. या सामंजस्य करारातून संशोधन केंद्राच्या कार्यात भर पडेल. हळद उद्योगात क्रांती घडणार – व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे येथील संशोधन केंद्र आता कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्याने देशातील अग्रगण्य हळद संशोधन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यापासून ते जागतिक बाजारपेठेत ब्रँडिंग करेपर्यंतच्या सर्व बाबींवर या माध्यमातून ठोस काम केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *