![]()
ग्रामीण भागातील गुणवंत आणि गरजू खेळाडूंना स्थानिक पातळीवरच दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पैठण येथे कावसानकर स्टेडियम उभारण्यात आले आहे. मात्र, हे स्टेडियम प्रशासकीय अनास्थेमुळे गैरसोयीचे बनले आहे. आज ना नियमित देखरेख आहे, ना खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा. त्यातच आता स्टेडीयम परिसराला बेकायदेशीर अतिक्रमणाने वेढल्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिसरातील अतिक्रमणे हटवून, त्यानंतरच मंजूर दीड कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. जायकवाडी धरणाच्या मुख्य मार्गावर दोन एकर शासकीय जागेत हे स्टेडियम उभारण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या संकुलाकडून तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठे बळ मिळेल, अशा अपेक्षा खेळाडूंना होत्या. मात्र, कालांतराने नियमित देखभाल-दुरुस्तीचा अभाव, अपुरा निधी आणि आवश्यक मनुष्यबळाची वानवा यामुळे या स्टेडियमची अवस्था बिकट होत गेली. सद्यस्थितीत आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नातून या स्टेडियमच्या पुनरुज्जीवनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून विविध कामे केली जाणार आहेत. मात्र, ही नवीन कामे सुरू करण्यापूर्वी मैदानाची झालेली दुरवस्था थांबवणे आणि येथील अतिक्रमण जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे मैदानाचे मूळ स्वरूपच पूर्णपणे बदलू लागले असून खेळाडूंना सराव करणे कठीण झाले आहे. काळजीवाहू कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करणे, अद्ययावत धावपट्टी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलसह विविध मैदानी खेळांसाठी स्वतंत्र मैदाने तयार करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वीचे मोठे आंदोलन निष्फळ स्टेडियमच्या जागेवर काही स्थानिक घटकांनी बेकायदेशीरपणे पक्की व कच्ची अतिक्रमणे करून ठेवली आहेत. हे अतिक्रमण हटवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील शेकडो खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी एकत्र येत जनआंदोलन उभारले होते. त्यावेळी प्रशासनाने आश्वासने देऊन आंदोलन दडपले, मात्र त्यानंतर आजतागायत एक इंचभरही अतिक्रमण काढले गेले नाही. आता मैदानासाठी दीड कोटी रुपयांचा नवा निधी मंजूर झाल्याने, प्रशासनाने सर्वप्रथम मैदानावरील संपूर्ण अतिक्रमण हटवावे, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. अतिक्रमणाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर Ãपैठण तालुक्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून दीड कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार काही कामे सुरू करण्यात आली आहेत. कावसानकर मैदानावर असणारा अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असून, या संदर्भातील अहवाल आणि अतिक्रमण हटवण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे आणि स्थानिक महसूल प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. – मुकुंद वाडकर, तालुका क्रीडा अधिकारी, पैठण
Source link
ना सुविधा, ना देखरेख; कावसानकर स्टेडियम अतिक्रमणाच्या विळख्यात:शहरातील स्टेडियम परिसराला अतिक्रमणाचा विळखा