Headlines

अमरावती विधान परिषद निवडणूक: 7 केंद्रांवर मतदान:22 जूनला मतमोजणी; काँग्रेसच्या चुप्पीमुळे महायुतीत उत्साह, बाजोरियांची याचिका मागे




अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आज, गुरुवार, १८ जून रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात सकाळी ८ वाजता सात केंद्रांवर मतदानाला सुरुवात होईल. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी मतमोजणीनंतर जाहीर केला जाईल. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या बाजोरिया प्रकरणात नवीन वळण आले असून, त्यांनी आपली याचिका मागे घेतली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने महाविकास आघाडीमध्ये शांतता आहे. याचा थेट परिणाम म्हणून महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे किती मते मिळवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जिल्ह्यात प्रथमच नगरसेवकांना तालुक्याच्या ठिकाणी मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सात उपविभागीय शहरांमध्ये मतदान केंद्रे उघडली जातील. ही मतदान केंद्रे संबंधित तहसील कार्यालयांमध्ये आहेत. यात अमरावती, अचलपूर, धारणी, दर्यापूर, मोर्शी, तिवसा आणि चांदूर रेल्वेचा समावेश आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी मात्र जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथील नियोजन भवनात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. बुधवारी दुपारपर्यंत सर्व मतदान पथके पोलीस बंदोबस्तात साहित्यासह केंद्रांवर रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या मतदारसंघात एकूण ४५१ मतदार असून, यात २२६ महिला आणि २२५ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. धारणी मतदान केंद्रावर ४२ मतदार आहेत, तर अचलपूर केंद्रावर ६९, मोर्शी केंद्रावर (वरुड, मोर्शी व शेंदुरजनाघाट मिळून) ८१, दर्यापूर केंद्रावर ६०, तिवसा-भातकुली केंद्रावर ३८, अमरावती केंद्रावर ९५ आणि चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर ६६ मतदार आपली मते नोंदवतील. काँग्रेसने आपला उमेदवार आजारी असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका घेतल्या. वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याबाबतही या बैठकांमध्ये चर्चा झाली. मात्र, शेवटपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. बैठकीतील चर्चा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कळवण्यात आली असून, त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी यापूर्वी सांगितले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *