![]()
राज्यात बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर राज्यात अॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणावरून उठलेल्या वादावर आपली भूमिका मांडली. अमरावती येथील एका कार्यक्रमात आरोग्याबाबत बोलताना “मी सावजी खाल्ले तर महिनाभर रुग्णालयात पडावे लागेल,” असे विधान मुंढे यांनी केले होते. या विधानावरून नागपुरातील हॉटेल व्यावसायिक आणि हलबा समुदायाच्या उद्योजकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मुंढेंनी आपल्या परंपरेचा अवमान केल्याचा आरोप करत माफीची मागणी केली होती आणि त्यांना सावजी जेवणाचे आमंत्रणही दिले होते. ‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही’ या वादावर स्पष्टीकरण देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “माझे वक्तव्य नीट ऐकल्यास लक्षात येईल की ते पूर्णपणे माझे वैयक्तिक मत होते. मी कोणालाही सावजी खाऊ नका असा सल्ला दिला नाही किंवा इतर कोणी आजारी पडेल असे म्हटले नाही. २००८-०९ मध्ये एका मित्रासोबत गेलो असताना अतितेलकट आणि तिखट अन्नामुळे मी तो पदार्थ टाळला होता. हा माझा वैयक्तिक अनुभव होता. त्यामुळे या प्रकरणात माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” एफडीएच्या कारभारावर आणि कारवाईवर मुंढेंचे मोठे खुलासे लॅब कर्मचाऱ्यांचे काम २४ तास, पण पाळ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए लॅबमधील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळत नसल्याच्या आरोपांवर मुंढे यांनी स्पष्ट केले की, प्रयोगशाळा २४ तास सुरू राहत असली तरी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४८ तास काम आणि एक दिवस साप्ताहिक सुट्टी दिली जाते. सरकारी कामाची वेळ फक्त ‘सकाळी १० ते संध्याकाळी ६’ असावी हा अट्टाहास चुकीचा असून कर्मचाऱ्यांचे गैरसमज दूर केले जातील. थेट परवाना रद्द का? कोणतीही नोटीस न देता अन्न आस्थापनांचे परवाने रद्द केले जात असल्याच्या तक्रारींवर बोलताना त्यांनी सांगितले, “जिथे नागरिकांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला होता किंवा अन्नपदार्थ अत्यंत अस्वच्छ होते, तिथेच थेट परवाना जप्तीची कडक पावले उचलली गेली आहेत. या कारवाईविरोधात व्यावसायिकांना अपील करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.” अपील आणि कायदेशीर बाजू कारवाई झालेल्या १६५ पैकी १०३ आस्थापनांनी आयुक्तांकडे अपील केले आहे. एफडीकडे सर्व प्रकारच्या कारवायांचे फोटो, व्हिडिओ आणि ठोस पुरावे उपलब्ध असून विभाग पूर्णपणे कायदेशीर चौकटीत राहूनच काम करत आहे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. अन् इथूनच वाद झाला सुरू “माझ्यासारख्या माणसाने सावजीचे जेवण केले तर किमान महिनाभर रुग्णालयात भरती व्हावे लागेल…’ असा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अमरावतीतील वक्तव्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला. यानंतर नागपुरातील सावजी हॉटेल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. “सावजी हा केवळ पदार्थ नसून आमची परंपरा आहे,’ असे सांगत हलबा उद्योजक ग्रुपचे संस्थापक प्रवीण सोरते आणि स्थानिक सावजी व्यावसायिकांनी मुंढेंना सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली असून तसे न केल्यास कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे. ३२ पेक्षा जास्त खड्या मसाल्यांचा वापर, ‘सावजी’ १०० वर्षे जुनी खाद्य संस्कृती सावजी खाद्यसंस्कृतीची सुरुवात १९२० ते १९३० च्या दशकात झाली. मध्य प्रदेशातील माळवा भागातून विदर्भात स्थलांतरित झालेल्या हलबा-कोष्टी (विणकर) समाजाने या संस्कृतीची पायाभरणी केली. कापड गिरण्या बंद पडल्यानंतर उदरनिर्वाहासाठी या समाजाने घरगुती खानावळी सुरू केल्या. मजुरांना ऊर्जा देणारे अन्न म्हणून सुरू झालेली ही खानावळ संस्कृती पुढे नागपूरची खरी ओळख बनली. सावजी मसाल्याचे मूळ केंद्र नागपूर जिल्ह्यातील उमरेड मानले जाते. उमरेडच्या सुक्या लाल मिरच्यांमुळे “उमरेड सावजी’ जगभरात प्रसिद्ध झाले. सावजी मसाल्याची खरी जादू त्यात वापरल्या जाणाऱ्या ३२ पेक्षा जास्त खड्या मसाल्यांच्या अचूक प्रमाणात असते. जहाल तिखट व रंगासाठी : उमरेड/नागपुरी लाल सुकी मिरची. चव व दाटपणासाठी दगडफूल, खसखस, सुकं खोबरं आणि पांढरे तीळ वापरले जातात. रश्श्यावर येणारी “काळी-तांबडी तर्री’ ही केवळ मसाल्यांच्या योग्य प्रमाणातून आणि संथ शिजवण्याच्या तंत्रातून येते. ‘सावजी’च्या मसाल्याला अपायकारक म्हणणे चुकीचे सावजी मसाल्याला अपायकारक ठरवणे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. या मसाल्यातील दगडफूल, सुंठ, जिरे, नागकेशर आणि खसखस आयुर्वेदात पाचक मानले जातात. अति प्रमाणात काहीही खाल्ले तर त्रास होईलच; पण योग्य पद्धतीने तयार केलेला पारंपरिक सावजी आरोग्यास घातक नाही.
– विष्णू मनोहर, ख्यातनाम शेफ आणि खाद्यसंस्कृती अभ्यासक
Source link
‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, ते माझं वैयक्तिक मत’:सावजी मटणाच्या वादावर तुकाराम मुंढेंचे रोखठोक स्पष्टीकरण