Headlines

कोथरूड भोंदूबाबा प्रकरण:मुख्य आरोपी दीपक खडकेचा तात्पुरता जामीन रद्द; फिर्यादीची रक्कम न भरल्याने सत्र न्यायालयाचा निर्णय




कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक जनार्दन खडके याचा सत्र न्यायालयाने दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात आला आहे. फिर्यादीची रक्कम परत न केल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती फिर्यादी पक्षाचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. या प्रकरणात वेदिका पंढरपूरकर, कृष्णाल पंढरपूरकर आणि दीपक खडके यांनी संगनमत करून फिर्यादीची देवीशक्ती, धार्मिक श्रद्धा आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीकडून बँक ठेवी, विमा पॉलिसी, पीपीएफ, ईपीएफ, दागिने तसेच परदेशातील घर विकून मिळालेली रक्कम अशा विविध माध्यमांतून तब्बल १४ कोटी ३१ लाख २० हजार ७९२ रुपये उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने सुरुवातीला जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर फिर्यादीची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या अटीवर आरोपी खडकेला तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत आरोपी दीपक खडके याने रक्कम परत केली नाही. यामुळे फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामीन रद्द करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी आरोपी क्रमांक ३ दीपक खडके याचा जामीन रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ वेदिका पंढरपूरकर आणि आरोपी क्रमांक २ कृष्णाल पंढरपूरकर यांनी न्यायालयाच्या अटींचे अंशतः पालन केल्याने त्यांच्या जामिनाची मुदत वाढविण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *