![]()
तब्बल 88 कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात दीर्घकाळापासून फरार असलेली मुख्य आरोपी विशाखा अविनाश राठोड हिला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने तिच्या प्रत्यार्पणाची कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. 3 ऑगस्ट रोजी पुण्यात आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. पुण्यातील बाणेर येथील ‘APS वेल्थ व्हेंचर्स LLP’ या कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोड, त्याची पत्नी विशाखा राठोड आणि त्यांच्या इतर साथीदारांवर गुंतवणूकदारांना कमी कालावधीत भरघोस आणि निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम विविध बँक व D-Mat खात्यांमध्ये वळवून तिचा मोठा अपहार करण्यात आल्याचे CBI च्या तपासात समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या विनंतीवरून CBI ने इंटरपोलच्या माध्यमातून विशाखाविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तपासाची व्याप्ती वाढली; 88 कोटींचा अपहार या प्रकरणी 20 एप्रिल 2023 रोजी पुणे येथील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेतील कलम 420, 406, 409 व 34 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (त्यांच्या वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण कायद्यातील कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या फसवणुकीची रक्कम 15 कोटी 45 लाख रुपये इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान आणखी अनेक फसवणूक झालेले गुंतवणूकदार समोर आल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढून फसवणुकीचा आकडा सुमारे 88 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखा करत आहे. अटकपूर्व जामीन फेटाळला; D-Mat खाती गोठवली मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2023 मध्येच विशाखा राठोडचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. साक्षीदारांच्या जबाबांनुसार, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेल्या काही महत्त्वाच्या बैठकांना ती स्वतः उपस्थित होती. तसेच कंपनीच्या खात्यातून तिच्या वैयक्तिक खात्यात मोठी रक्कम वर्ग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी तिची कोठडीतील चौकशी अत्यंत आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मे 2023 मध्येच पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्देशानुसार सर्व आरोपींची D-Mat खाती गोठवण्यात आली आहेत. पती-पत्नीची एकत्रित चौकशी होणार यापूर्वी, विशाखाचा पती आणि मुख्य सूत्रधार अविनाश राठोड याला 23 जुलै 2023 रोजी UAE मधून भारतात आणून महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. आता विशाखा राठोड पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या पती-पत्नीची एकत्रित चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अपहार केलेल्या रकमेचा नेमका मार्ग, खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती, इतर साथीदारांची भूमिका आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या बुडालेल्या पैशांच्या वसुलीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Source link
एपीएस वेल्थ व्हेंचर्स फसवणूक प्रकरण:तब्बल 88 कोटींचा गंडा घालून यूएईत पळालेली विशाखा राठोड अखेर जाळ्यात; पुणे पोलिसांकडून ताबा