![]()
नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात वेब सीरिज आणि डार्क नेटवरील हिंसक कंटेंटच्या प्रभावातून एका तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत अपहृत तरुणीची सुखरूप सुटका केली असून, आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली होती. आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले आणि एका बंद खोलीत डांबून ठेवले. ओटीटीवरील गुन्हेगारी कार्यक्रम आणि डार्क नेटच्या प्रभावातून आरोपीने तरुणीचे लैंगिक शोषण करून तिची हत्या करण्याचा कट रचला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सायबर सेलच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे अचूक ठिकाण शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाड टाकून बंद खोलीचा दरवाजा तोडला आणि आरोपीला रंगेहात अटक केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी तरुणीची सुटका केली असून, आरोपीचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. ऑनलाईन आणि डार्क नेटवरील आक्षेपार्ह साहित्यामुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याच्या या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
Source link
अपहृत तरुणीची पोलिसांकडून सुटका:नागपुरात वेब सीरिज, डार्क नेटच्या प्रभावातून अपहरण; आरोपीला ठोकल्या बेड्या