![]()
शिवसेनेतील ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकीय वर्तुळात अद्यापही संभ्रम कायम असून, ठाकरे गटाचे खासदारही यावर उघडपणे बोलणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावला आहे. तसेच ‘आता राडा होईल’ असा थेट इशारा राऊत यांनी फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दिला आहे. एकीकडे, अरविंद सावंत यांनी ‘कोणतेही ऑपरेशन यशस्वी झाले नसून सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत’ असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र हे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी (फुल प्रूफ) झाल्याचा दावा केला जात असल्याने या राजकीय नाट्यातील सस्पेन्स आणखी वाढला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, ऑपरेशन टायगर म्हणायला हे त्यांना न शोभणारे आहे, शिवसेनेतील बंड म्हणजे अस्वलाच्या केसासारखे आहे, कितीही गेले तरी फरक पडत नाही. मात्र, जर ऑपरेशन टायगर यशस्वी झालेय तर आम्हाला चेहरे दाखवा. कारण, जसे पश्चिम बंगालचे खासदार जाऊन भेटले, तसे यांनीही जाऊन भेटावे. गेलेच आहेत, तर अधिकृतपणे जाहीर करावे, असे म्हणत सावंत यांनी ऑपरेशन टायगर फेल झाल्याचे म्हटले. तसेच, आमचे सर्वच्या सर्व नऊ खासदार आमच्यासोबत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. उद्या सर्व खासदार बैठकीला येतील पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, आम्ही बैठकीसाठी व्हिप बजावला असून उद्या आमचे खासदार बैठकीला उपस्थित राहतील, तेव्हा तुम्हाला कळेलच, असे म्हणत सावंत यांनी ऑपरेशन टायगरवर आपली भूमिका मांडली. तसेच, दिल्लीत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, मी आणि उद्या संजय पाटील येतील, इतर खासदारही येतील. संजय दिना पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले खोटा भ्रम पसरवला जात आहे, मला प्रामाणिक खासदारांबद्दल वाईट वाटते, विनाकारण त्यांचीही नावे घेतली जातात. पण, सगळे खासदार आमच्यासोबत आहेत, कारण 14 तारखेलाच आम्ही त्यांच्याशी बोललो, 4 दिवसांपूर्वी बोललेली माणसे आज तसे करतील का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच संजय दिना पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले, ते घरी आहेत. संजय पाटील यांनी मी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले आहे. निंबाळकरांशी माझा संपर्क झाला नाही ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी प्रश्न विचारला असता अरविंद सावंत म्हणाले, ओमराजे निंबाळकरांशी माझा संपर्क झाला नाही. आम्ही कशाला कोणावर अविश्वास दाखवू, आमच्या नेत्यांवर का अविश्वास दाखवू. काल आकडा 7 होता, सकाळी 6 पर्यंत आला होता. आता, हळूहळू आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे, असेही सावंत यांनी सांगितले आहे.
Source link
ऑपरेशन टायगर यशस्वी झालेय तर चेहरे दाखवा:आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोब, खासदार अरविंद सावंतांचा दावा