![]()
दुगाव येथील दुग्धेश्वर मैदान येथे सुरू असलेल्या संत मीराबाई संगीतमय चरित्रकथेचा पाचवा दिवस अत्यंत भावपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरला. कथाकार वैष्णवभूषण श्री राधा महाराज (देवरगावकर) यांनी शुक्रवारी (दि. १०) संत मीराबाईंच्या जीवनातील अत्यंत कठीण मात्र तितक्याच प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. कथेच्या पाचव्या दिवशी मीराबाईंचा चित्तोडगडचे राजकुमार कुंवर भोजराज यांच्याशी झालेला विवाह सोहळा सादर करण्यात आला. श्री राधा महाराजांनी मीराबाईंची लग्नाची मुळीच इच्छा नव्हती. ज्या कृष्णाला त्यांनी बालपणापासून पती मानले होते, त्या व्यतिरिक्त कोणालाही पती स्वीकारणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी या विवाहास तीव्र विरोध केला होता, मात्र कौटुंबिक जबाबदारी आणि मर्यादेपोटी त्यांना या बंधनात अडकावे लागले, असे सांगितले. मीराबाईंचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. लहानपणीच त्यांच्या आईचे छत्र हरपले आणि त्यानंतर आधार देणारे त्यांचे लाडके आजोबा राव दुदाजी यांचेही निधन झाले. महाराजांनी अत्यंत भावूक होत सांगितले की, मीराबाईंच्या आयुष्यातील पहिले गुरू हे त्यांचे आजोबा राव दुदाजीच होते, ज्यांनी त्यांच्या मनात कृष्णभक्तीचे बीज पेरले होते. लग्नानंतर मीराबाई चित्तोडगडच्या राजप्रासादात आल्या, पण त्यांचे मन तेथे रमले नाही. याच काळात त्यांना खऱ्या ज्ञानाची ओढ लागली आणि त्यांना सद्गुरू रोहिदास महाराजांची (रविदास) प्राप्ती झाली, असे महाराजांनी सांगितले. जसे राव दुदाजींनी मीराबाईंना भक्ती शिकवली, तसेच आपल्या घरातील थोरामोठ्यांनी मुलांना लहानपणीच चांगले संस्कार देणे हे जीवनाचे पहिले पाऊल आहे, असेही महाराजांनी सांगितले.
Source link
दुगावला उलगडले मीराबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग:संत मीराबाई संगीतमय कथेच्या पाचव्या दिवशी राधा महाराजांचे निरुपण