![]()
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. या सभेला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, कल्पना खरे, राजेंद्र पाटील, मंगेश कोळपकर, जयराम देसाई, मारुती जोशी, मोरेश्वर जोशी, नंदकुमार काकीर्डे, दिगंबर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रदीप पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, विद्याधर अनस्कर, भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश गोगावले, माजी पोलिस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, प्रविण गायकवाड, बाळासाहेब दाबेकर, संगीता तिवारी, जिल्हा परिषदेचे आशिष जराड, प्रताप भोईटे, संदीप जगताप यांच्यासह विविध वृत्तपत्रांतील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय, राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शैलेश काळे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी कायम लढणारा, निर्भीड आणि स्पष्टवक्ता हरपल्याने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. राजीव साबडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, पत्रकार संघाच्या उभारणीपासून ते इमारत, सभागृह, रस्ता अशा पायाभूत सुविधांसाठी प्रकाश भोईटे यांचे मोठे योगदान होते. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात त्यांनी दिलेला लढा, संघटित शक्तीवर ठेवलेला विश्वास आणि पत्रकार कुटुंबासाठी घेतलेली जबाबदारी हे त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले होते. अंकुश काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भोईटे यांनी ग्रामीण भागातील निर्भीड आणि स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून काम केले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या कारभाराबरोबरच भ्रष्ट कारभारदेखील पुढे आणला, असे त्यांनी नमूद केले.
Source link
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना