Headlines

विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, ऊर्जा व नवकल्पना महत्त्वाची:केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांचे आर्यन्स ग्रुपच्या परिषदेत आवाहन




“युवा पिढीची ऊर्जा, नवकल्पना यांतून विज्ञान-तंत्रज्ञान आणि हरित उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि नवकल्पनांचे विश्व देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे,” असे मत केंद्रीय कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी व्यक्त केले. विकासामुळे नागरिकांचे स्वास्थ्य अबाधित राहते व तीच स्वस्थ मानसिकता देशाला प्रगतीकडे अधिक वेगाने घेऊन जाणारी ठरेल, असेही ते म्हणाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’, या तंत्रज्ञान व नवकल्पनाविषयक तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दुबे बोलत होते. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन हिंजवडी येथील हॉटेल विवांता येथे झाले. हरित उर्जा व जैवइंधन क्षेत्रातील तज्ज्ञ पद्मभूषण डाॅ. ज्येष्ठराज जोशी, हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. रमण वेदराजन, ‘इस्रो’चे उपसंचालक नवलकिशोर गुप्ता, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, सहकार्यकारी अध्यक्ष स्मिता शितोळे-जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सतीशचंद्र दुबे म्हणाले, “विविध क्षेत्रांत देश आत्मनिर्भर कसा होईल, याचा विचार आणि कृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे. २०४७ मधील विकसित भारत या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानामार्फत हे उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न सर्व क्षेत्रांत सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती वेगाने होत असून, सुईपासून जहाजबांधणी आणि सेमी कंडक्टर्स व अत्याधुनिक बॅटरीच्या निर्मितीपर्यंत आपला देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शहर आणि गाव, यांच्यातील आधीचे अंतर, दुरावा आता संपत चालला असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे नागरी सुविधांचा विस्तार होत आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण भारतीय बनावटीच्या निर्यातक्षम उत्पादनांची श्रेणी विस्तारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धीमत्ता, उत्साह आणि नवकल्पनांचे योगदान संशोधन व निर्मितीसाठी द्यावे.” डाॅ. ज्येष्ठराज जोशी यांनी हरित ऊर्जा तसेच जैवइंधन या विषयावर मार्गदर्शन केले. रिॲक्टर्सची निर्मिती जर आपण देशात केली, तर प्रत्येक रिॲक्टरमागे आपण १०० कोटी रुपये वाचवू शकतो. आयात केलेला एक रिॲक्टर १३५ कोटी रुपयांना पडतो. त्यामुळे या क्षेत्रातील मूलभूत गुंतवणुकीचा सकारात्मक विचार आणि कृती आवश्यक आहे. देशात लिक्विड, घन आणि वायू स्वरुपात जो बायोमास निर्माण होतो, तो ऊर्जेचा महाप्रचंड स्रोत आहे. जमिनीची मशागत आणि कस वाढवण्यासाठीही बायोमासचा वापर शक्य आहे. प्रयोगशाळांमध्ये सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता प्रत्यक्ष व्यवहारात हे संशोधन वापरात आणण्यासाठी यंत्रणा गरजेची आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *