Headlines

नागरी समितीला 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान:कोहिनूर राम नदी महोत्सवाचा समारोप, पुनरुज्जीवनाचा निर्धार




पुणे येथे कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) भूगाव येथील नागरी समस्या निवारण समितीला उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘राम नदी सेवक सन्मान’ प्रदान करण्यात आला. यावेळी राम नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे, पंढरीनाथ शिवराम शेडगे आणि शिवाजी काशीनाथ रणवरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी हा पुरस्कार स्वीकारला. पत्रकार भवन येथे आयोजित या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी राम नदीचे प्रदूषण त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रदूषण, राडारोडा, अतिक्रमण, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा अशा अनेक समस्यांनी राम नदी वेढलेली आहे.” गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व स्तरातील नागरिक, युवा पिढी आणि सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास ही परिस्थिती बदलता येईल. या महोत्सवातून राम नदीवर आधारित लघुपट आणि पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. चित्रपट हा समाजजीवनाचा आरसा असून, या महोत्सवाद्वारे नदीचे वास्तव मांडले गेले. केवळ महोत्सव करून न थांबता, नदी स्वच्छ, सुंदर आणि अविरल ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले की, मातेसमान नद्यांची अवहेलना होऊ नये, ही जागृती या महोत्सवाद्वारे झाली आहे. भविष्यात राम नदीसंदर्भात विविध सामाजिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून ‘राम नदी संसद’ आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच, दर महिन्याला ‘राम नदी परिक्रमा’ आयोजित करून नदीची ओळख करून दिली जाईल आणि लहान-मोठ्या उपक्रमांतून नदीची शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिल करंजावणे म्हणाले की, राम नदी परिक्रमा करताना निर्मळ नदी अशुद्ध झाल्याचे पाहून खूप दुःख झाले. मानवनिर्मित प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांनी नदी स्वच्छता अभियान सुरू केले. ‘देशाचे देणे लागतो’ या भूमिकेतून ते अविरतपणे कार्यरत आहेत. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *