Headlines

संभाजीनगरचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवणार:मनपा आयुक्त अमोल येडगे यांची ग्वाही; येडगे अन् जी. श्रीकांत यांचा स्वागत, सत्कार समारंभ




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त मनपा आयुक्त अमोल येडगे आणि नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार व स्वागत समारंभ शनिवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पुरुषोत्तम भापकर यांनी २०१३ मध्ये शहराच्या डीपीवर काम सुरू केले होते, त्याचा कळस श्रीकांत यांनी रस्ते मोकळे करून चढवला. श्रीकांत हे प्रशासनातील ‘युझर फ्रेंडली अँड्रॉइड फोन’ सारखे होते, ज्यांनी नेहमी आपलेपणा जपला. अतिक्रमण कारवाईत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विश्वास दिला. कर्मचाऱ्यांचा विमा काढल्यामुळेच, अनधिकृत बॅनर काढताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १.१० कोटींची मदत मिळू शकली. श्रीकांत यांनी नियम पाळताना नगरसेवक पतीवरही गुन्हे दाखल करण्यास मागेपुढे पाहिले नाही. महापौर राजूरकर यांनी आता अमोल येडगे यांनी हा विकासाचा पाया कळसापर्यंत न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, प्रोबेशन काळापासून मला जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी केलेल्या कामाची उंची अधिक वाढवण्याचे काम मी करेन. शहराच्या प्रगतीत आता १२५ माजी नगरसेवकांचा अनुभव सोबत असेल. पाणीपुरवठा विभागाच्या कामाला गती देऊन नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यावर माझा भर असेल. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अत्यंत भावूक होत आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, लोक मला विचारायचे की किती दिवस मराठवाड्यात अडकून राहणार? पण या मातीचे माझ्यावर ऋण होते आणि ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जबाबदारी दिली. मनपा आयुक्त म्हणून आलो तेव्हा ईडी चौकशी सुरू होती, पण मी डगमगलो नाही. शहराला १० दिवसांनी पाणी मिळते याची मला लाज वाटत होती. आता विभागीय आयुक्त म्हणून प्रत्येक घराला पाणी देण्यासाठी मी बांधील आहे. पुढच्या तीन वर्षात शहराचा चेहरा बदलेल. अतिक्रमण काढताना कुणाची घरे तोडणे हा आनंद नव्हता, तर शहर मोकळे करणे हा उद्देश होता, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास आमदार संजय केनेकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, प्रभारी जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *