Headlines

शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन‎




योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो (अहिल्यानगर), माजी सैनिक कै. आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान व सूर्यतेज संस्था (कोपरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लक्ष्मीवाडी येथील सोमैया विद्या मंदिर येथे भव्य योग प्रशिक्षण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून पाटील बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार उच्चारण आणि गुरुमंत्राने झाली. यानंतर योगतज्ञ प्रशिक्षक संतोष नलगे, महेश थोरात आणि रोहित काळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सूर्यनमस्कार, पद्मासन, उत्कटासन, पश्चिमोत्तानासन, ताडासन, वृक्षासन, बकासन, उत्तानपादासन, सर्वांगासन आणि हलासन या विविध आसनांची शास्त्रोक्त माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून त्याची प्रात्यक्षिके करून घेतली. सामूहिक ध्यान आणि प्रार्थनेने या शिबिराचा समारोप झाला. योग प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ िनींचा आणि आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. स्वागत मुख्याध्यापक संजय राऊत यांनी केले, प्रास्ताविक स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी, तर सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. लक्ष्मीवाडीसारख्या ग्रामीण भागात अशा स्वरूपाचा दर्जेदार योग प्रशिक्षण कार्यक्रम प्रथमच आयोजित केला होता. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक संजय अमोलिक, राम ढोकचौळे, रुपाली टेके, माधुरी गायकवाड, योगेश चव्हाण, बाळासाहेब जोरी आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी केंद्रीय संचार ब्यूरोचे बबलूकुमार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाचपाटील, पर्यवेक्षक बाबासाहेब खळदकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *