Headlines

शेलगावमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गाव माझा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम;‎ ग्रामस्थांकडून कौतुक‎




करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (क) येथील पायघन वस्ती शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना गाव माझा प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. या साहित्यामध्ये स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी आवश्यक शैक्षणिक वस्तूंचा समावेश होता. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर अण्णासाहेब जगताप, माजी मुख्याध्यापक पांडुरंग वीर हे होते. यावेळी सरपंच प्रतिनिधी राहुल कुकडे, माजी उपसरपंच सचिन वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ वीर, वैभव वीर, गणेश माने, डॉ. विकास वीर, मयूर वीर, बाबुराव माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विकास वीर यांनी सांगितले की, गाव माझा प्रतिष्ठान ही कोणतीही औपचारिक कार्यकारिणी नसलेली, समाजहितासाठी एकत्र आलेल्या ग्रामस्थांची संकल्पना आहे. शेलगाव हे आपले गाव आहे, ही भावना जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे असे त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी प्रतिष्ठानच्या भावी उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्तांकडून ११ हजारांची देणगी कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वीर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच ह.भ.प. हरिहर महाराज यांनी ५ हजार ५५१ रुपयांची देणगी जाहीर करून उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले. शेलगाव : विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना प्रतिष्ठानचे पदाधिकारी. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गाव माझा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. शिक्षण . गाव माझा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक उपक्रम ; ग्रामस्थांकडून कौतुक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *