![]()
पुण्यात हडपसर भागात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी टँकर चालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. नेहा सुमीत उपाध्ये (वय २७, रा. सनराईज हाऊसिंग सोसायटी, सातवनगर, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार पती सुमीत सुनील उपाध्ये (वय ३०) जखमी झाले. टँकर चालक रामेश्वर देवीदास यमगिर (वय ३२, सध्या रा. घुलेनगर, महंमदवाडी, हडपसर, मूळ रा. यमगिरवाडी, ता. पालम, जि. परभणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमीत उपाध्ये यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत आणि त्यांची पत्नी नेहा हे हडपसरमधील सय्यदनगर येथील रेल्वे भुयारी मार्गातून सातवनगरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. नेहा रस्त्यावर पडल्याने टँकरच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार आणि पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टँकरचालकांकडून होणाऱ्या अपघातांमुळे पोलिसांनी महिन्याभरापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात टँकर मालक आणि चालकांची बैठक घेतली होती. या बैठकीत टँकर चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही, टँकर चालकांच्या बेदरकारपणामुळे गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, वाघोलीतील केसनंद रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप मनोजभाई पटेल (वय ३९, रा. न्याती सोसायटी, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. महेश ज्ञानेश्वर संकपाळ (वय ३७, रा. न्याती सोसायटी, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार संदीप पटेल हे वाघोलीतील केसनंद रस्त्याने जात असताना भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक रेश्मा इंगळे तपास करत आहेत.
Source link
टँकरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात भीषण अपघात, पती गंभीर जखमी; चालक अटक