Headlines

रुक्मिणीनगरमध्ये दीड महिन्यांपासून मलबा साचला:महापालिकेने दुसऱ्यांदा ट्रक पाठवण्याचे आश्वासन दिले, पण दुर्लक्ष




अमरावती प्रतिनिधी: शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रुक्मिणीनगर-जोगळेकर प्लॉट भागातील सर्व्हिस गल्लीत गेल्या दीड महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मलबा साचलेला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदा ट्रकने मलबा उचलल्यानंतर, उर्वरित मलबा नेण्यासाठी दुसऱ्यांदा ट्रक पाठवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दीड महिना उलटूनही तो अद्याप आलेला नाही. यापूर्वी, जेसीबीच्या सहाय्याने मलबा गोळा करून एका ट्रकमध्ये भरण्यात आला होता. परंतु, सर्व मलबा ट्रकमध्ये न मावल्याने काही भाग शिल्लक राहिला. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरच दुसरा ट्रक घेऊन येऊन उर्वरित मलबा उचलून नेण्याचे सांगितले होते. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना साचलेल्या घाणीमुळे डास, कीटक आणि दूषित वातावरणाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधला, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही समस्या रुक्मिणीनगरमधील जोगळेकर प्लॉट, पवार डायव्हिंग स्कूल, अंबिका सीटी स्कॅनजवळ नवरंगे यांच्या घराला लागून असलेल्या गल्लीत आणि मागील सर्व्हिस लाईनमध्ये आहे. दीड महिन्यांपासून मलबा न उचलल्याने, वादळ-वाऱ्यामुळे आणि जनावरांच्या फिरस्तीमुळे तो बाजूच्या नाल्यांमध्ये साचला आहे. यामुळे नाल्या पूर्णपणे गाळाने भरल्या असून सांडपाण्याचा प्रवाह बदलला आहे, ज्यामुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढला आहे. सर्व्हिस लाईनमधील नाल्यांचे बांधकाम अनेक ठिकाणी खचले आहे, ज्यामुळे घुशी आणि उंदरांची वाढ झाली आहे. यामुळे वारंवार माती आणि कचरा नाल्यात जमा होतो. नागरिकांनी पक्की नाली बांधून मिळावी आणि रपटा मोकळा करावा यासाठी काही दिवसांपूर्वी लेखी तक्रार केली आहे. या भागातील नागरिक संतोष देशमुख यांनी सांगितले की, जेसीबीने कचरा जमा केला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नाही. स्वच्छतेचे पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *