Headlines

मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी‎




राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार अक्षय कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुळा धरण प्रशासनाच्या या निर्णयामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार कर्डिले यांची भेट घेऊन अडचण मांडली होती. विद्युत मोटारी पूर्णपणे बंद झाल्यास केवळ शेतीच नाही तर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा-पाण्याचाही भीषण प्रश्न निर्माण होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची गंभीर अडचण लक्षात घेऊन आमदार कर्डिले यांनी महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राहुरीतील या गंभीर परिस्थितीची माहिती पालकमंत्र्यांना दिली आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर योग्य तो सुवर्णमध्य काढण्याची विनंती केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मुळा धरण प्रशासनाशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना ‘दिवसआड दोन तास’ विद्युत मोटारी सुरू ठेवण्यास मुळा धरण प्रशासनाने अधिकृत परवानगी दिली. पशुपालकांना मोठा आधार मिळाला या निर्णयामुळे राहुरी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता कायम राहणार असल्याने पशुपालकांनाही मोठा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार कर्डिले आणि सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *