Headlines

खरीप पिकांवर संकट; मृग नक्षत्र कोरडे; बळीराजा चिंतेत:आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची गरज; अनेक भागांत धुरळा‎




रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे महान व परिसरातील बळीराजा प्रचंड चिंतेत पडला आहे. खरिपातील मूग आणि उडदाची पेरणी मृग नक्षत्रात करणे अत्यंत महत्त्वाचे असते; मात्र पावसाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पेरण्या करता आलेल्या नाहीत. बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीन मशागत करून पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. मात्र, वरुणराजाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी जूनच्या सुरुवातीला कपाशीची लागवड केली खरी; मात्र आता विहिरी, बोअरवेल्सची पाणी पातळी खालावल्याने ही पिके जगवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. कडक उन्हामुळे कपाशीची झाडे पिवळी पडून सुकू लागली आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होऊनही पाऊस हुलकावणी देत आहे. आर्द्रा नक्षत्राकडून आशा; मूग, उडदाची पेरणी धोक्यात : सोमवारी (दि. २२) पावसाच्या आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आहे. या नक्षत्राच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला, तरच महान परिसरातील शेतकरी उडीद, मुगाची पेरणी करू शकतील. अन्यथा, या पिकांची पेरणी यंदा नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी बरड जमिनीमध्ये आता पिकांऐवजी मातीचा धुरळा उडताना दिसत आहे. शेतकऱ्यांसमोर सोयाबीन, तूर आणि कपाशीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पावसासाठी ठिकठिकाणी नागरिकांकडून साकडे अनेक शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून किंवा गुरेढोरे विकून महागडी बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहेत. गतवर्षीचा तोटा यावर्षी भरून काढू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे. त्यामुळेच, दमदार पावसासाठी महान येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने मशिदीत विशेष प्रार्थना (दुआ) करण्यात आली. तसेच ईदगाह मैदानावर ‘गोडभात’ करून लहान मुलांना महाप्रसाद वाटण्यात आला. महानसह बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक मंदिरांमध्येही वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *