Headlines

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कुर्डुवाडीत सत्ताधारीच उतरले उपोषणाला:सभापती संजय टोणपे यांचे आंदोलन




कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित विकासकामांसह शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांचे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ, नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. अखेर प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी ४ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. सभापती संजय टोणपे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रलंबित विकासकामांचे सर्व प्रस्ताव आगामी सभेच्या अजेंड्यावर तातडीने घ्यावेत, शहरातील अत्यावश्यक नागरी कामांना तात्काळ प्रशासकीय व आर्थिक मान्यता द्यावी, सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी व स्वच्छ शौचालये युद्धपातळीवर उभारावीत आणि मंजूर कामांची निश्चित कालमर्यादा लेखी स्वरूपात जाहीर करावी, अशा मागण्या केल्या होत्या. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते समीर मुलाणी यांनी प्रभाग विकास कामांचे विषय अजेंड्यात समाविष्ट न केल्याबाबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर सह आयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी कुर्डुवाडी मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवत गेल्या गेल्या तीन महिन्यांत एकही विषय पटलावर घेतला नाही. अखेर सत्ताधारी शिक्षण सभापतींवरच आपल्याच प्रशासनाविरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आली. शहरातील अर्धवट कामांची गंभीर दखल घेत प्रभारी मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी कार्यालयीन अधीक्षक बापूसाहेब चोबे यांच्या माध्यमातून आंदोलक टोणपे यांच्याशी संपर्क साधला आणि दोन कडक नोटीस बजावत लेखी आश्वासन दिले. तसेच सदस्यांनी दिलेले विकासकामांचे विषय अध्यक्षांनी विषय पत्रिकेवर घेतले नसल्याबाबत जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रभारी मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिल्यानंतर संजय टोणपे यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप, समीर मुलाणी, अमरकुमार माने, मोहसीन मकनू, वसीम मुलाणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. . महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज शौचालय बांधकाम : हे काम अर्धवट ठेवून विद्यार्थ्यांची गैरसोय करणाऱ्या कंत्राटदार अक्षय बागल यांना कार्यादेशाची मुदत संपल्यापासून दंड आकारण्यात येत आहे. पुढील ३ दिवसांत काम सुरू न केल्यास काम रद्द करून त्यांच्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर कंत्राटदाराने ३ दिवसांत काम सुरू करण्याचे दूरध्वनीद्वारे मान्य केले. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला बांधकाम : पहिल्या मजल्याचे उर्वरित काम १० ते १५ दिवसांत पूर्ण न केल्यास कंत्राटदार प्रशांत एस. पैकेकर यांची सुरक्षा ठेव, अनामत व बयाणा रक्कम जप्त करून संस्था काळ्या यादीत टाकण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली. कंत्राटदाराने हे काम १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी लिहून दिले . ^आपल्याकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाहीत. ते प्रभारी मुख्याधिकारी आहेत. तेही महिन्यातून एकदा येतात. मागच्या कामाबाबतचे अहवाल हे प्रभारी मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहीत. ते अहवाल मिळाल्यानंतर सदर सदस्यांचे विषय घेण्यात येतील. जयश्री भिसे, नगराध्यक्षा, कुर्डुवाडी नगरपरिषद अहवाल मिळाल्यानंतर सदर सदस्यांचे विषय घेण्यात येतील



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *