Headlines

पीएम स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्यांना कर्जवाटप:सटाण्यात तीन टप्प्यांत 15, 25 व 50 हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण‎




केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात पात्र पथविक्रेत्यांना १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपयांचे कर्ज तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आले. नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पीएम स्वनिधी योजनेला केंद्र शासनाने मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती देण्यात आली. तसेच शहरातील सर्व बँकांनी पथविक्रेत्यांचे प्रलंबित कर्ज प्रस्ताव तातडीने मंजूर करून कर्जवितरण करावे, अशा सूचना करण्यात आल्या. अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, वन रेशन-वन नेशन कार्ड, पीएम श्रमयोगी मानधन, पीएम जनधन, जननी सुरक्षा, पीएम मातृत्व वंदना तसेच बांधकाम कामगार योजनेसह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मेळाव्यात पंकज पवार, नितीन पाडवी, स्वप्नील पाटील आणि विनायक रावळकर यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात उपस्थित पथविक्रेत्यांच्या विविध शंकांचे निरसन करून कर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहितीही लाभार्थ्यांना देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना असे मिळणार अर्थसहाय्य योजनेंतर्गत शहरातील ८८३ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे सुमारे ९२ लाख रुपये, ३४४ लाभार्थ्यांना २५ हजार रुपयांप्रमाणे ७४ लाख रुपये, तर १०१ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांप्रमाणे ५० लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना बँकांमार्फत क्रेडिट कार्डची सुविधाही दिली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *