Headlines

आशा भोसलेंची शेवटची इच्छा कोणती होती?:आशाताईंचा जुना व्हिडिओ व्हायरल, पांढऱ्या साड्या नेसण्यामागचा किस्साही सांगितला




भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ आज संपुष्टात आला आहे. आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सहा दशकांहून अधिक काळ श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. आशाताईंच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी आपली ‘शेवटची इच्छा’ व्यक्त केली होती. त्यांची शेवटची इच्छा ऐकून डोळे पाणावतात. आशा भोसले यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. या दरम्यान, अमृता राव आणि अनमोल यांनी आशाताईंना त्यांच्या अंतिम इच्छेबाबत विचारणा केली. आशाताईंनी व्यक्त केलेल्या इच्छेवरून त्यांचे आपल्या कलेवर, म्हणजेच गायनावर नितांत प्रेम असल्याचे अगदी स्पष्ट होते. आशा भोसले म्हणाल्या की, “माझे देवाकडे एकच मागणे आहे, मी गात असतानाच, मला मरण यावे… बास्स… हीच माझी मनापासून इच्छा आहे. आता माझ्यासाठी शिकण्यासारखे काहीच उरलेले नाही. आता आणखी काय शिकायचे बाकी आहे? गाणे हेच ​​माझे आयुष्य आहे. मी अगदी बालपणापासून गात आले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मी माझ्या वडिलांकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. माझे संपूर्ण आयुष्य मी याच कलेला समर्पित केले आहे. मी सिनेसृष्टीत ८० ते ८२ वर्ष व्यतीत केली आहेत आणि आता, माझी अंतिम इच्छा केवळ हीच आहे की, मी या जगाचा निरोप घ्यावा. जर गात असतानाच मी या जगातून एक्झिट घेतली, तर त्यामुळे मला सर्वाधिक आनंद होईल.” आशा भोसले यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अखेरच्या इच्छेने आज रसिक प्रेक्षक भावूक झाले आहेत. पांढऱ्या साड्या का नेसायच्या आशा भोसले-लता मंगेशकर? आशा भोसले व लता मंगेशकर या दोन्ही बहिणी पांढऱ्या साडच्या नेसायच्या. यामागचे कारण स्वतः आशा भोसले यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांचा पॉडकास्टमध्ये सांगितले होते. “मी आणि दीदी याशिवाय आमच्या इतरही बहिणी… त्या काळात आम्ही सगळ्याजणी पांढऱ्या साड्या नेसायचो. आम्हाला असे वाटायचे की, पांढरी साडी आमच्यावर शोभून दिसते. जर रंगीत साड्या नेसल्या, तर आम्ही कदाचित आणखी सावळ्या दिसू असे वाटायचे. त्यामुळेच आम्ही पांढऱ्या साड्या नेसायचो. त्यानंतर मग मी गुलाबी साड्या नेसायला सुरुवात केली. तेव्हा दीदीने डोळ्यांनी एक कटाक्ष दिलेला की, हे कधी झाले? केव्हा झाले? पण, तेव्हापासून मग मी घरात गुलाबी साडी नेसायला सुरुवात केली. कोलकाता येथील साड्या तेव्हा स्वस्त असायच्या, मग तिथल्याच साड्या आम्ही जास्त नेसायचो,” असे आशा भोसले यांनी सांगितले होते. “दीदी घरी अगदी सामान्यपणे वागायची. पण, ती माझ्याशी बाहेर खूप औपचारिक आणि सौम्यपणे बोलत असे. घरी आमचे एक वेगळे नाते होते, आम्ही मराठीत बोलायचो. मात्र, गाण्याच्या बाबतीत आमच्यात कोणतेही नाते नव्हते. ती बाहेर लता मंगेशकर होती आणि बाहेर तिचा स्वतःचा दर्जा होता,” असेही आशा भोसले म्हणाल्या होत्या. १९४३ मध्ये मिळाला पहिला ब्रेक ८ सप्टेंबर १९३३ रोजी आशा भोसले यांचा जन्म ब्रिटिश भारतातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे रंगमंच कलाकार होते. आशा अवघ्या ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत लतांनीच संघर्ष करून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि बहिणींचे संगोपन केले. कुटुंब आधी पुणे आणि नंतर मुंबईत येऊन स्थायिक झाले. येथे अवघ्या 10 वर्षांच्या वयात आशा भोसले यांनी गाणे सुरू केले. त्यांना पहिला ब्रेक मराठी चित्रपट ‘माझा बाळ’ (१९४३) मधील ‘चला चला नाव बाळा’ या गाण्याने मिळाला. आशा फक्त १५ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांना हिंदी चित्रपट ‘चुनरिया’ मधील ‘सावन आया’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली. अष्टपैलू गायिकेचा प्रवास थांबला गझल, अभंग, भावगीते, भूपाळी ते अगदी पाश्चात्य ढंगाची ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’ सारखी सुपरहिट गाणी… आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या संगीतात आपल्या आवाजाची जादू निर्माण केली. केवळ गायनच नाही, तर संगीतात नवनवीन प्रयोग करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना ‘बॉलिवूडची सर्वात वर्सटाईल गायिका’ म्हणून ओळखले गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडिलांकडे संगीताचे धडे गिरवणाऱ्या आशाताईंनी आपल्या आयुष्यातील ८० हून अधिक वर्षे या कलेला समर्पित केली होती. उद्या दुपारी होणार अंत्यसंस्कार आशा भोसले यांना शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी प्रचंड थकवा आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे (सर्व अवयव निकामी झाल्याने) त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंचे पार्थिव उद्या, सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत त्यांच्या लोअर परळ येथील ‘कासा ग्रांडे’ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *