Headlines

मोर्शीत बेकायदेशीर घरगुती मीटर सक्तीच्या विरोधामध्ये हल्लाबोल:महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन‎




शहरासह तालुक्यातील घरगुती ग्राहकांवर बेकायदेशीर स्मार्ट मीटर लादण्याच्या सक्तीचा तीव्र निषेध व्यक्त करीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विद्युत अभियंता कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लेखी निवेदन कार्यकारी अभियंता कासट यांना देण्यात आले. भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व तालुका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत प्रीपेड स्मार्ट मीटर हे संपूर्णपणे पर्यायी आहेत. ते बसवणे ग्राहकांच्या वैयक्तिक निवडीवर अवलंबून आहे. त्यामुळे महावितरण कंपनीला ते सक्तीने लादता येणार नाही, असे केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट केल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जून २०२४ मध्ये घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची अंमलबजावणी स्थगित केली होती. असे असतांना मोर्शी महावितरण कार्यालय या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचा थेट आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. १ एप्रिल २०२६ रोजी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीन सुधारणा करून प्रीपेड मीटरबाबत सक्तीची अट काढून टाकली आहे. कलम ५५ आणि ५६ नुसार कोणतेही जुन्या मीटरची बदली किंवा नवीन मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकाला लेखी पूर्वसूचना देणे आणि त्याची संमती मिळवणे महावितरणला बंधनकारक असतानाही महावितरणच्या वतीने हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर बसवणे सुरू आहे. मोर्शी हा कृषीप्रधान तालुका आहे येथील बहुसंख्य वीज ग्राहक हे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. स्मार्ट मीटरच्या तांत्रिक जटिलता, नेटवर्कच्या अडचणीमुळे आणि संभाव्य तांत्रिक त्रुटीमुळे या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी रेटून धरली. महावितरण प्रशासन कायद्याला आणि जनतेच्या भावनांना केराची टोपली दाखवून ही मोहीम सक्तीने राबवीत असेल तर यापुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक देऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक नितीन पन्नासे यांच्या नेतृत्वात आप्पासाहेब गेडाम, नगरसेवक हर्षल चौधरी, ब्रह्मानंद देशमुख,भास्कर फंदे,अजय आगरकर, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल चौधरी, महिला अध्यक्ष सुनंदा लाडवीकर, आकाश भोंडे, आशिष अढावू, धीरज भोंडे, रामराव भूंबर, नितीन चिखले, रवी मोरे, गजानन हटवार, अशोक फंदे, शेख नाझीर शेख चांद, विठ्ठल नवरे, मनोहर लाडवीकर यासह शेकडो ग्राहकांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *