Headlines

नागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलवर FDA ची धडक कारवाई:20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त; औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले




नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत, रुग्णालयाच्या बेसमेंटमधून विनापरवाना साठवलेला तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. संबंधित जागेवर औषध विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आल्याने, तसेच औषधांच्या खरेदी-विक्रीची आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात व्यवस्थापन अपयशी ठरल्याने एफडीएकडून ही धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान, जप्त केलेल्या औषधांपैकी दोन नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या प्रकरणात औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकलमधूनच औषधे विकत घेण्यास भाग पाडण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची प्रत दिली जात नसल्याचेही एफडीएच्या तपासणीत समोर आले आहे. रुग्णालयाने संगणकीय प्रणालीद्वारे थेट फार्मसीकडे औषधांची मागणी नोंदवण्याची पद्धत अवलंबल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची मुभा देणाऱ्या एफडीएच्या आदेशाचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे. शिवाय, ‘रुग्णांना औषधे कोठूनही घेण्याचा अधिकार आहे’, असा माहिती फलकही रुग्णालयात कुठेही लावण्यात आलेला नव्हता. औषध विक्रीच्या अनेक नियमांचे सर्रास उल्लंघन या रुग्णालयाकडून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले आहे. मेडिकल स्टोअरवर केमिस्ट अँड ड्रगिस्टचा अधिकृत नामफलक लावलेला नव्हता, मुदतबाह्य (एक्स्पायरी डेट संपलेल्या) औषधांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केलेली नव्हती, तसेच ‘शेड्यूल H-1’ अंतर्गत येणाऱ्या औषधांचा साठा आणि त्याच्या नोंदींमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. एवढेच नाही तर, अनिवार्य असलेले तपासणी पुस्तक (फॉर्म-35) देखील उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याने, अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून पुढील कठोर कारवाई प्रस्तावित केली आहे. याच पार्श्वभूमीवर, कोणत्याही रुग्णाला विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती झाल्यास त्यांनी तात्काळ एफडीएकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. मंदिर परिसरात खासगी दुकानदारांकडून प्रसादाच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत, भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे कडक निर्देश आयुक्त मुंढे यांनी दिले आहेत. यासोबतच, दुधातील भेसळ रोखण्यासाठीही प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक कारवाईमुळे शिर्डीसह राज्यातील इतर मंदिर परिसरांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी केलेला कोणताही खेळ यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. तसेच, आगामी काळात भेसळखोरांविरोधातील हे धाडसत्र अधिक तीव्र केले जाईल, असे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *