Headlines

लाचखोर अधिकाऱ्याचे सीलबंद घर फोडले:नातेवाईकांसह दोघांना रंगेहात अटक, एसीबीच्या कारवाईनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?




जळगावातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या या सीलबंद घरात शिडीच्या साहाय्याने प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. लाचखोर अधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर, एसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत शिरलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घुसखोरीमागे मोठा कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले आरोपी लोकसेवक किरण चौधरी यांच्याच सांगण्यावरून हा घरफोडीचा प्रयत्न झाला होता का, याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच, एसीबीच्या पुढील कारवाईपूर्वी घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू परस्पर हटविण्याचा हा प्रयत्न होता का, या सर्व बाबींचा पोलिस आता सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात अटकेत असलेले दोन्ही आरोपी हे किरण चौधरी यांचेच नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. घरातील संपर्क क्रमांक आणि हिशोबाच्या नोंदी असलेली महत्त्वाची डायरी लांबविण्याच्या उद्देशानेच हा घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, जळगाव पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *