![]()
कर्मिक्षा निधी बँकेने फसवणूक केलेल्या ग्राहकांच्या प्रकरणाची गाडगेनगर पोलिस ठाण्यातून फाईल गहाळ झाली आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी या प्रकरणात चौकशी करून तक्रारदारांना दिलासा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीसाठी मूळ फाईलच उपलब्ध नसल्याने पोलिस अधिकारी अडचणीत आले आहेत. कर्मिक्षा निधी बँकेने राधानगर येथे कार्यालय उघडून भाजीपाला-फळ विक्रेते, इस्त्री करणारे, हातगाडी व कटलाचालक अशा सुमारे साडेतीनशेहून अधिक छोट्या व्यावसायिकांना लक्ष्य केले होते. २०२०-२१ मध्ये बँकेने दैनंदिन बचत खाती उघडून व्यवसायवृद्धीसाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवले. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केल्यानंतर बँकेच्या संचालकांनी कार्यालय बंद करून पळ काढला. या फसवणुकीची माहिती समोर आल्यानंतर, जगदीशप्रसाद श्रीवास (मसानगंज, अमरावती) यांच्यासह आठ जणांनी ५ जुलै २०२१ रोजी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यावेळी संचालक संतोष सरदार (छत्रपती संभाजीनगर) आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पंकज ढोके यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी रखडली आहे. चौकशी अधिकारीही बदलले, परंतु अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. तक्रारदारांनी नुकत्याच झालेल्या तक्रार निवारण दरबारात पुन्हा तक्रार केली, त्यानंतर पोलिस आयुक्तांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. मात्र, आता फाईल गहाळ झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. सध्या चौकशी अधिकारी गहाळ झालेल्या फाईलचा शोध घेत असून, संबंधित तक्रारदारांकडून पुन्हा माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मूळ कागदपत्रे पाच वर्षांपूर्वीच तत्कालीन चौकशी अधिकाऱ्याकडे सादर केली असल्याने ती पुन्हा मिळवणे तक्रारदारांसाठी कठीण झाले आहे. यामुळे पीडित नागरिकांनी खासदार बळवंतराव वानखडे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. खासदारांनीही या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी सांगितले की, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जुन्या कागदपत्रांची फाईल उपलब्ध नसल्याने तक्रारदारांकडून पुन्हा तपशील गोळा केले जात आहेत. प्रसंगी, तत्कालीन अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येईल.
Source link
बँक फसवणूक प्रकरणाची पोलिस फाईल गहाळ:आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाही, ग्राहकांचे खासदार वानखेडेंना साकडे