Headlines

भरधाव कारच्या धडकेत निवृत्त वायरमनचा मृत्यू:पत्नी गंभीर, वैजापूर स्टेशन रोडवरील अपघात‎




शहरातील स्टेशन रोडवरील राजपाल क्लॉथ सेंटरसमोर रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत महावितरणचे निवृत्त वायरमन माधव मुरलीधर दळवी (७७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पुष्पलता माधव दळवी (६७) या गंभीर जखमी झाल्या. मूळचे खंडाळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी माधव दळवी यांनी महावितरणमध्ये वायरमन म्हणून संपूर्ण सेवा खंडाळा परिसरात बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर ते वैजापूर येथील शिवप्रतापनगरमध्ये वास्तव्यास आले होते. दळवी दांपत्य (एमएच २० एचडी ०३४३) दुचाकीवरून स्टेशन रोडने जात होते. राजपाल क्लॉथ सेंटरसमोर वळण घेत असताना वैजापूर शहराच्या दिशेने भरधाव येणाऱ्या (एमएच १४ जेआर ७९९८) क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलविले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माधव दळवी यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या पुष्पलता दळवी यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. दळवी यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. रविवारी रात्री ८.३० वाजता वैजापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागरिकांनी जखमी दळवी दाम्पत्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यासाठी धावपळ सुरू केली होती. याचा फायदा घेत कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी कारचा क्रमांक मिळवला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *