![]()
पंचायत समिती सदस्यांसाठी पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय निवासी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात ग्रामविकास, प्रशासन, नेतृत्व विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या निवासी प्रशिक्षणात पंचायत समितीचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकप्रतिनिधींनी आत्मसात करावयाचे नेतृत्वगुण, प्रशासन आणि समाजकारणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग, तसेच शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातील प्रत्येक सत्र व्यावहारिक आणि सोप्या पद्धतीने सादर करण्यात आल्याने सहभागी सदस्यांना दैनंदिन कामकाजात थेट उपयोगी पडणारे ज्ञान व कौशल्ये आत्मसात करता आली. ग्रामविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनाशी सुसंवाद आणि लोकाभिमुख विकासकामे अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास सहभागी सदस्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मोहोळ पंचायत समिती सभापती असलम चौधरी,उपसभापती उल्का पाटील,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड,पंचायत समिती सदस्य नीलम मसलकर,अमरिका कापसे,पार्वती गावडे, धनाजी माळी,गणेश मुळे,संजीव खिलारे उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्याची नवी दृष्टी, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाल्याची भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली. ग्रामविकासाच्या दृष्टीने अशा प्रकारचे निवासी प्रशिक्षण भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षाही यावेळी सदस्यांनी व्यक्त केली. शिबिरामुळे ग्रामीण विकासाची व्यापक दृष्टी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि जनतेच्या अपेक्षांनुसार अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. – नीलम मसलकर, पंचायत समिती सदस्य, आष्टी
Source link
निवासी प्रशिक्षणातून पं.स. सदस्यांना मिळाली नवी दिशा:प्रशिक्षण नियमितपणे आयोजित करण्यात यावे