![]()
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर लासीना पाटी जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ता. १३ मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे. घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने वृध्द आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील तेलंगवाडी येथील सचिन भाऊराव वानोळे (२२) याच्याकडे दोन एकर शेती असून या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सचिन हा घरातील कर्ता पुरुष असल्याने वृध्द आई वडिल त्याच्यावरच अवलंबून आहेत. रविवारी ता. १२ सायंकाळी सचिन हे दुचाकी वाहनावर हिंगोलीकडे आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ते परत गावाकडे जात असतांना हिंगोली ते कळमनुरी मार्गावर भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात सचिन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक संतोष इंगळे, जगन पवार, जमादार गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या सचिन यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या अपघातानंतर या मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघातसग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत सचिन यांच्या पश्चात आई, वडिल, बहिण असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Source link
लासीना पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू:कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर