![]()
पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई करण्यात आली असून, सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०७ परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. विभागात एकूण २ हजार ५७६ खत विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८१ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली, तर २७७ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. जिल्हानिहाय कारवाईचा तपशील असा: पुणे जिल्ह्यात ६५० केंद्रांची तपासणी झाली, ज्यात ७१ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळल्याने २७ परवाने निलंबित करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणी करण्यात आली. साठेबाजी आणि इतर नियमांच्या उल्लंघनामुळे १६ परवाने निलंबित, २ परवाने रद्द करण्यात आले असून, ३ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. येथे १८ खतांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले. जिल्ह्यात ६४ परवाने निलंबित, ४ परवाने रद्द करण्यात आले असून, ४ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी विभागातील ४२ औद्योगिक युनिट्सचीही तपासणी करण्यात आली. यापुढेही खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक, पुणे बाबासाहेब जेजुरकर यांनी दिला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत. तसेच, खतांच्या विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Source link
पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल