![]()
प्रतिनिधी | दिंडोरी येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या सर्व बॅचचे विद्यार्थी या सोहळ्यासाठी एकत्र आले होते, त्यामुळे संपूर्ण परिसर जुन्या आठवणींनी बहरला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अजित पटवा, माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष कैलास गायकवाड आणि सचिव गोपाळ घुगे यांची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या ‘मार्कंडेय’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी महाविद्यालयाच्या २५ वर्षांतील संघर्षाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज आम्ही ज्या क्षेत्रात यशस्वी आहोत, त्यामागे या महाविद्यालयाचे आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. मेळाव्याचे औचित्य साधून उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Source link
दिंडोरी नाईक महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा:रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य