![]()
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या धाराशिवच्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घालण्याचा कट आखला होता. पण पोलिसांना कार्यक्रमापूर्वीच या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी संशयितांची धरपकड केली. आता शिंदेंनी पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. ते स्थानिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही हजर राहणार होते. पण त्यांच्या या कार्यक्रमात काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्याचा कट आखला होता. संबंधितांना तसे मेसेजही पाठवण्यात आले होते. शिंदेंपुढे अन्याय झाल्याचा पाढा वाचायचा आणि भावनाविवश झालेल्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाला खतपाणी घालून शिवसेनेत फूट पाडायची, असा हा कट होता. पण तत्पूर्वीच पोलिसांना या गुप्त कट कारस्थानाचा सुगावा लागला. त्यांनी संबंधित कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना नजरकैदेत डांबले. पोलिसांच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. सरनाईकांनी दिले कारवाईचे संकेत प्रस्तुत कटात कोणत्या शिवसैनिकांचा समावेश होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यासाठी फूस लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यापूर्वी काही शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवले होते, तर काहींना कार्यक्रमाला न जाण्याच्या नोटीसा पाठवल्या होत्या. पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात होणाऱ्या संभाव्य गोंधळासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली होती. कुणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देण्याची भूमिका शिंदेंची आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे सरनाईक म्हणाले. नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाराज शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जवळपास 50 शिवसैनिकांनी या प्रकरणी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आज हे सर्व कार्यकर्ते खासदार श्रीकांत शिंदे यांची सोलापूर येथे भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत. तसेच ते एकनाथ शिंदेंचीही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या घटनाक्रमामुळे जिल्हा परिषद निवडणुकांपासून सुरू झालेली शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता पुन्हा तीव्र होताना दिसत आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओमराजेंनी शिंदेंसोबत एकत्र येणे टाळले उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे 8 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा यासंबंधी केला जात आहे. या खासदारांनी ठाण्यात शिंदेंची गुप्त भेट घेतल्याचीही चर्चा आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. पण त्यांनी तत्काळ हे वृत्त फेटाळून लावत आपण ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी उगीचच चर्चेला पेव फुटू नये यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या रविवारच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली नाही. हे ही वाचा…
Source link
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कट फसला:टीप मिळताच पोलिसांनी केले नजरकैद; शिंदेंनीही मागवला अहवाल