![]()
‘माझ्या मानेला गाठ असल्याने मी वारंवार आजारी पडत होते. काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रार्थनेसाठी गेले. तिथे मला आजारपणातून बरे होण्यासाठी परंपरा बदलण्यास सांगण्यात आले. विधी करून माझा प्रवेश निश्चित झाला. मात्र तीन वर्षे होऊनही मला आजारपणातून सुटका मिळाली नाही. घरी पूजा करण्यासही मनाई होती. नंतर समुपदेशनामुळे मी पुन्हा स्वधर्मात आले…’ ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात आलेल्या महिला सांगत होत्या. आजार बरा करतो, अर्थिक मदत करतो अशी वेगवेगळी प्रलोभने दाखवून सोलापुरात ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या तब्बल ३० कुटुंबांना गेल्या ६ महिन्यात पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. शहरातील झोपडपट्टी भागांमधील नागरिकांच्या गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते, असा दावा मातृशक्ती आयाम या संघटनेने केला आहे. या कुटुंबांना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी संघटनेने शुद्धीकरण मोहीम राबवली. त्यातून ३० कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आले. या कुटुंबांना पैशांचे आमिष दाखवून, आजारपणात उपचारांचा खर्च करून किंवा तसे प्रलोभन दाखवून ख्रिश्चन धर्मात ओढले जात असल्याचा आरोप “मातृशक्ती आयाम’च्या सोलापूर प्रमुखांनी केला. इंग्रजांच्या काळाप्रमाणेच “चैन सिस्टिम’ वापरून परदेशी निधीच्या जोरावर ठरावीक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हे धर्मांतरण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर शहरातील विशिष्ट भागांना लक्ष्य करून हे धर्मांतरण घडवून आणले गेल्याचे सांगण्यात आले आहे. बळजबरीने धर्मांतर करण्याचा अधिकार नाही संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे पालन व आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र बळजबरीने किंवा आमिष दाखवून इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. आर्थिक हतबलता, आजारपण किंवा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करण्याचे प्रयत्न सामाजिक स्थैर्याला बाधा आणू शकतात.
Source link
ख्रिश्चन झालेल्या महिलेसह 30 कुटुंबे झाली पुन्हा हिंदू:सोलापुरात मातृशक्ती आयाम संघटनेची मोहीम