![]()
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत २२ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यांनी ही मोहीम हाती घेतली असून, यात अधिकाधिक मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सपकाळ बोलत होते. ही बैठक सोमवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनमध्ये ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना पुढील पाच दिवसांत प्रत्येकी १०० मुलींची नोंदणी करण्याचे निर्देश दिले, म्हणजेच दररोज २० मुलींची नोंदणी करावी. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, राहुल गांधी यांचे सहकारी मनोज त्यागी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते हनुमंत पवार, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभाग अध्यक्ष आणि माजी आमदार दिप्ती चवधरी, शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, युवती अध्यक्ष स्वाती शिंदे, कैलास गायकवाड, चंद्रशेखर कपोते आणि प्रदेश सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश पाटील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून वसुधा निरभवने, सुरेखा परिहार, अनिता खरात, कल्पना पडळकर, सुनीता हजारे, ऋषिकेश चव्हाण, ऋषी ओव्हाळ आणि सनी परमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी पुणे शहरात युवक एकत्रित येणाऱ्या ठिकाणी होर्डिंग्ज लावण्याची सूचना केली. तसेच, एलईडी स्क्रीन असलेल्या व्हॅन शहरात फिरवण्यात याव्यात असेही त्या म्हणाल्या. मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन करत, निष्ठेने काम करणाऱ्यांना आगामी काळात न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी सत्तेत असताना पाठबळ दिले आहे. राहुल गांधी यांनी पुण्यातील ऐतिहासिक महत्त्व ओळखून केवळ मुलींसाठी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच जातीवादी आणि धर्मविरोधी शक्तींविरोधात राहुल गांधी यांनी देशात एक लढा निर्माण केला आहे.
Source link
राहुल गांधींच्या उपस्थितीत पुण्यात 'छात्रों की गूंज' कार्यक्रम:22 ऑगस्ट रोजी होणार आयोजन; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची माहिती