Headlines

राहुल गांधींनी भाषेचे भान ठेवणे गरजेचे:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एकेरी उल्लेख करणे शोभत नाही- हसन मुश्रीफ




वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका पार पाडताना भाषेचे भान राखणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा एकेरी उल्लेख करणे राहुल गांधींना शोभत नाही. त्यांनी या दोन्ही नेत्यांचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सुनावले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतील. मात्र त्यांना कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही किंवा शिव्या देण्याचा अधिकार नाही. राहुल गांधी यांचे वय खूप लहान आहे. त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे. इथेनॉलवर धोरणावर काय म्हणाले मुश्रीफ? हसन मुश्रीफ यांनी इथेनॉलवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, इथेनॉल धोरण सर्वात आधी अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणले, त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. ऊस उत्पादक शेतकरी यांचे खूप मोठे भले इथेनॉल धोरणामुळे झाले आहे. तसेच राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करून काय मिळणार आहे, मला माहीत नाही. शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील ऊसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलावले आहे. त्यावेळी मी पवार साहेबांना विनंती करणार आहे की, इथेनॉल धोरणाबद्दल जरा राहुल गांधी यांना सांगा. शेतकऱ्यांची एफआरपी देण्याचं काम इथेनॉलच्या पैशातून होत आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होत, असे एकाही कंपनीने सांगितलेले नाही. फक्त मायलेजा थोडे कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. नंदुरबारच्या रस्त्यांविषयी काय म्हणाले हसन मुश्रीफ? हसन मुश्रीफ हे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते म्हणाले, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. महिन्यातून एक दोन वेळा मी नंदुरबारला जात असतो. सुरतवरून नंदुरबारला तीन तासाचा रस्ता आहे त्यापैकी दोन तास गुजरातमधील रस्ते चांगले आहेत आणि एक तास नंदुरबार जिल्ह्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता असल्याने मी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मी त्या दिवशी सांगितले आपल्याला आता दर्जेदार रस्ते करायला पाहिजेत. तिथल्या रस्त्यांची जी अवस्था आहे ती पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार ते त्यांचे कामच आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील आता राज्यातील नेते रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर रस्ते खराब होतात ते खराब न होता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे हे माझे म्हणणे होते. सरकार येतात आणि जातात कोणतेही सरकार आले तरी पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून खड्डे पडणार नाहीत असे रस्ते तयार केले पाहिजेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *