Headlines

अखेर पालकमंत्रिपदे जाहीर:रायगडची धुरा भरत गोगावलेंकडे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी; महायुतीतील 'पॉवर गेम'चा तिढा सुटला




राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेचा बनलेला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक महिन्यांच्या राजकीय रस्सीखेचीनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची, तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची अधिकृत वर्णी लागली आहे. महायुतीतील पॉवर गेमच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय अंतर्गत धुसफूस थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये मोठी राजकीय ओढाताण सुरू होती. भरत गोगावलेंचा ‘वनवास’ संपला; रायगडवर शिवसेनेचे वर्चस्व एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हापासून भरत गोगावले हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गोगावले हे मंत्रिपदाच्या आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर होते. मात्र, राज्यात अजित पवार गटाने सत्तेत प्रवेश केला आणि राजकीय गणिते बदलली. अदिती तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष अजितदादा पवार गटाकडून मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशामुळे गोगावलेंचे मंत्रिपद हुकले होतेच, शिवाय त्यांच्या हक्काच्या रायगड जिल्ह्यावरही राष्ट्रवादीचा दावा आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी होती. शिंदेंची राजकीय खेळी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळत कट्टर समर्थक असलेल्या गोगावलेंना रायगडची धुरा सोपवली आहे. या निर्णयामुळे कोकणात शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व अबाधित राहिले असून, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध शमवण्याचा प्रयत्न झाला आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजनांची एंट्री, ‘सुवर्णमध्य’ साधत भाजपने मारली बाजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हा महायुतीसाठी दुसरा मोठा डोकेदुखीचा विषय ठरला होता. उत्तर महाराष्ट्राचे राजकीय केंद्र असलेल्या नाशिकवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस होती. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्रिपदावर प्रबळ दावा सांगितला होता. दुसरीकडे, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि मंत्री दादा भुसे हेदेखील या पदासाठी आग्रही होते. दोन्ही नेत्यांचे वजन मोठे असल्याने हा तिढा सोडवणे कठीण झाले होते. संकटमोचकाकडे जबाबदारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या संघर्षात भाजपने ‘सुवर्णमध्य’ काढत अत्यंत हुशारीने हे पद आपल्याकडे खेचून आणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे दोन्ही मित्रपक्षांमधील वादही टळला आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्याची सूत्रे भाजपकडे सुरक्षित राहिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय महत्त्वाचा या नियुक्त्यांकडे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून पाहता येणार नाही. जिल्ह्यातील पक्षीय संघटनांची बांधणी आणि महायुतीतील जागावाटपाची समीकरणे याच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना राजकीय महत्त्व आहे. रायगडमध्ये भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेला जिल्ह्यात आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याची संधी मिळू शकते. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नियुक्तीमुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक आणि राजकीय समीकरणांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, महायुतीतील तीनही पक्षांची स्थानिक पातळीवरील स्पर्धा आणि एकमेकांशी असलेले राजकीय मतभेद पाहता पालकमंत्र्यांसाठी समन्वय राखणे हे मोठे आव्हान असणार आहे. आता विकासकामांना गती मिळणार? पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमधील रखडलेल्या प्रशासकीय निर्णयांना आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्हा नियोजन समिती, विकास निधीचे वाटप, विविध विभागांमधील समन्वय आणि स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आता भरत गोगावले आणि गिरीश महाजन आपापल्या जिल्ह्यांमध्ये विकासाचा अजेंडा कसा पुढे नेतात, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गासह पायाभूत सुविधांचे प्रश्न, तर दुसरीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी, शेती आणि औद्योगिक विकासाचे प्रश्न आहेत. त्यामुळे दोन्ही पालकमंत्र्यांसमोर मोठी जबाबदारी असणार आहे. हेही वाचा… रिपोर्टर बनणार का? राज ठाकरेंचा सवाल:रायगडच्या ‘व्हायरल गर्ल्स’चं उत्तर ऐकून तेही झाले थक्क, म्हणाले- आता मुलाखती बंद करा अन् अभ्यासाला लागा! गावातील रस्त्याची दुरवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनी तयार केलेला एक साधा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो राज्यभरात व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. या धाडसी विद्यार्थिनींच्या प्रयत्नाचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील या तीन विद्यार्थिनींनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी तिन्ही मुलींचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी तिन्ही विद्यार्थिनींचा सन्मान केला, भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *