![]()
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) असे आहे. अरफातचे मामा आसीफ नासीर अन्सारी (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरफात अन्सारी वाघोलीतील केसनंद फाटा चौकातून जात असताना एका भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अरफातला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. वाघोली पोलीस फरार टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या अपघातात कात्रज बाह्यवळण मार्गावरही एका वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव गोविंद कृष्णा चव्हाण (वय ८८, रा. व्यंकटेश ऑर्किड सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) आहे. यशस्वी अनिल चव्हाण (वय २५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यशस्वी चव्हाण यांचे आजोबा गोविंद हे कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात असताना आंबेगाव बुद्रुक परिसरातील अभिनव महाविद्यालयासमोर एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आंबेगाव पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत असून, सहायक पोलीस निरीक्षक एन पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू:केसनंद फाटा परिसरात अपघात, चालक फरार