![]()
गावातील रस्त्याची दुरवस्था दाखवण्यासाठी शाळकरी मुलींनी तयार केलेला एक साधा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो राज्यभरात व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. या धाडसी विद्यार्थिनींच्या प्रयत्नाचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक केले आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील या तीन विद्यार्थिनींनी मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी तिन्ही मुलींचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. कोंदिवडे ते सालपे या मार्गाची दुरवस्था गेल्या अनेक दिवसांपासून कायम होती. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोणतीही मोठी राजकीय किंवा सामाजिक मोहीम उभी राहिली नाही. अखेर नेहा आत्माराम घारे, ज्योत्स्ना रोहिदास मुकणे आणि मानसी पवार या शाळकरी मुलींनी स्वतःच या रस्त्याची ‘रिपोर्टिंग’ करण्याचा निर्णय घेतला. छत्रीचा केला माईक अन् रस्त्याची रिपोर्टिंग पावसाळ्यात रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास या मुलींनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडला. हातात छत्री घेऊन आणि त्याचा माईक बनवून त्यांनी रस्त्याची दुरवस्था दाखवली. रस्त्यावर साचलेले पाणी, खड्डे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कपड्यांची होणारी खराबी त्यांनी व्हिडिओतून दाखवली. विशेष म्हणजे हा व्हिडिओ तयार करताना त्यांचा उद्देश प्रसिद्धी मिळवणे नव्हता. आपल्या गावातील रस्ता चांगला व्हावा आणि प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे जावे, एवढाच उद्देश असल्याचे मुलींनी सांगितले. मुलींनी तयार केलेला हा व्हिडिओ आधी स्टेटसवर ठेवण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला आणि काही दिवसांतच राज्यभरात पोहोचला. पाहा शाळकरी मुलींनी केलेले रिपोर्टिंग आमचा उद्देश फक्त रस्ता चांगला व्हावा एवढाच होता या विद्यार्थिनींनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या व्हिडिओमागची भूमिका सांगितली. आम्ही दररोज याच रस्त्यावरून शाळेत जातो. रस्त्याची अवस्था पाहून व्हिडिओ तयार करण्याची कल्पना आली. हा प्रश्न कोणी दाखवणार नसेल, तर आपणच तो दाखवण्याचा प्रयत्न करावा, असे वाटल्याने व्हिडिओ तयार केला, असे त्यांनी सांगितले. “आम्ही मजा-मस्ती म्हणून व्हिडिओ बनवला. दुसऱ्या दिवशी तो खूप व्हायरल झाल्याचे समजले. आमचा उद्देश फक्त रस्ता चांगला करून मिळावा एवढाच होता,” असे मुलींनी सांगितले. त्यांच्या या साध्या प्रयत्नाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालो आहोत, याची सुरुवातीला आपल्यालाच कल्पना नव्हती, असेही त्यांनी सांगितले. पांढरा शालेय गणवेश, पण खड्ड्यांच्या पाण्याने रोज त्रास रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे मुलींनी सांगितले. त्यांच्या शाळेचा गणवेश पांढऱ्या रंगाचा आहे. मात्र पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी वाहनांमुळे उडून अंगावर येते. त्यामुळे शाळेचा गणवेश खराब होतो आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षकही याच रस्त्यावरून ये-जा करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा नसून गावातील अनेक नागरिकांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हिडिओ व्हायरल होताच खड्ड्यांवर खडी-मुरूम विद्यार्थिनींच्या व्हिडिओचा परिणाम काही दिवसांतच दिसून आला. त्यांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरूम टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्याचे काम करण्यात आले. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या व्हिडिओची दखल घेतल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यानंतर या रस्त्याचे पक्के काम केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थिनींनी लोकप्रतिनिधींनी केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी रस्ता तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरी भागातील रस्ते चांगले, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. शहरी भागातील रस्त्यांची स्थिती तुलनेने चांगली असते; मात्र ग्रामीण भागातील रस्त्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, अशी व्यथा त्यांनी मांडली. “लोकप्रतिनिधींनी रस्ता बनवायला हवा. आमच्याशी अद्याप कुठलाही संपर्क झालेला नाही,” असेही विद्यार्थिनींनी सांगितले. त्यांच्या या मागणीमुळे सोशल मीडियावरही ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंची भेट या मुलींच्या व्हिडिओची दखल राजकीय नेत्यांनीही घेतली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना सायकल भेट दिली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुलींना शिवतीर्थावर बोलावून त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी तिन्ही विद्यार्थिनींचा सत्कार करत त्यांच्या धाडसाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, या विद्यार्थिनींचा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या काळातच राज ठाकरे रायगड दौऱ्यावर होते. त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत रस्त्यांच्या प्रश्नावरून सरकार आणि संबंधित यंत्रणांवर टीका केली होती. त्यामुळे रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या या विद्यार्थिनींची राज ठाकरे यांनी घेतलेली भेटही विशेष चर्चेचा विषय ठरली. महाराष्ट्रातल्या मुला-मुलींच्या उपयोगाची प्रगती होत नसेल तर त्या विकासाचा काय उपयोग? रायगड दौऱ्यात राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर सरकारला सवाल केला होता. “आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर या विकासाचा काय उपयोग? महाराष्ट्रातल्या मुला-मुलींच्या उपयोगाची प्रगती जर होत नसेल तर काय चाटायची ती प्रगती?” असा सवाल त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कोंदिवडे गावातील विद्यार्थिनींनी स्थानिक रस्त्याच्या समस्येसाठी घेतलेला पुढाकार आणि त्यानंतर झालेली राज ठाकरेंची भेट याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आले आहे. एका छोट्याशा व्हिडिओने अनेक विद्यार्थ्यांना दिला आवाज या तीन मुलींच्या व्हिडिओचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील इतर अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. एका छोट्याशा गावातील तीन विद्यार्थिनींनी मोबाईलच्या माध्यमातून मांडलेला प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर रस्त्याची डागडुजी झाली. त्यामुळे सामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर आवाज उठवला तर त्याचा प्रशासनावर दबाव निर्माण होऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तात्पुरता रस्ता तयार झाला असला तरी पावसाळ्यानंतर या मार्गाचे कायमस्वरूपी काम कधी सुरू होते, याकडे कोंदिवडे ग्रामस्थांसह या तीन विद्यार्थिनींचेही लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मुंबईतील कांदिवलीमध्ये इमारतीला भीषण आग: 11 जणांची सुखरूप सुटका, सुदैवाने जीवितहानी नाही मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील स्टेशन रोडवर असलेल्या एका चार मजली कमर्शियल इमारतीत सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. सकाळी सुमारे ४.१४ वाजता आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
रस्त्याची दुरवस्था दाखवणाऱ्या रायगडच्या शाळकरी मुली थेट राज ठाकरेंच्या भेटीला:व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासन जागं, तात्पुरता रस्ता तयार