![]()
विकसीत भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून जिल्हयातील ५६३ पैकी केवळ पाच ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित राहिल्याने प्रशासन चांगलेच तोंडघाशी पडले. अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून वेळ मारून नेण्यात आली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद पंचायत विभाग व हमी योजनेचा कारभार चर्चेत आला आहे. केंद्र शासनाच्या विकसीत भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पंच संमेलन आयोजित करून या योजनेची माहिती स्थानिक पातळीवर पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पंच संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा परिषद पंचायत विभाग व हमी योजना विभागावर सोपविण्यात आली. या पंचसंमेलनात व्हीबी जी रामजी या अभियानाचे उदिष्ट, या कायद्यांतर्गत पंचायत राज संस्थांची भुमिका आणि जबाबदाऱ्या, विकसीत ग्रामपंचायत योजना आराखडा तयार करणे व मंजूर करणे, कुटुंब नोंदणी व ग्रामीण रोजगार हमीपत्रांचे वितरण करणे, मालमत्तेचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख, देखभाल, इतर ग्रामीण विकास कार्यक्रमांशी समन्वय याबाबीची माहिती देण्याचे सूचीत करण्यात आले होते. त्यानुसार हमी योजना कार्यालय व पंचायत विभागाने या पंच संमेलनाचे आयोजन करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी संमेलनास उपस्थित राहण्याबाबत कळविण्याचे ग्रामसेवकांना सांगण्यात आले. मात्र या पंच संमेलनाची प्रचार व प्रसिद्धी झालीच नाही. त्यामुळे ता. १२ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या या पंच संमेलनात जिल्हयातील ५६३ पैकी पाच ग्रामपंचायतीचे सरपंचच हजर होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी संमेलनाकडे पाठ फिरविल्यामुळे हमी योजना व पंचायत विभागाचे अधिकारी चांगलेच तोंडघाशी पडले. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना संमेलनात बसवून उपस्थितांची संख्या वाढविण्याचा खटाटोप दोन्ही यंत्रणांनी केला. दरम्यान, या प्रकारामुळे हमी योजना व जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा कारभार चर्चेत आला असून लोकप्रतिनिधींनी पाठ का फिरवली याची शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
Source link
‘विकसित भारत’ जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे लोकप्रतिनिधींची पाठ:केवळ पाच सरपंच उपस्थित, प्रशासनाची फजिती