![]()
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत दावा केला होता. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता याच प्रकरणावर राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत या आगीत आणखी तेल ओतले आहे. “गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या जाचाला कंटाळले होते आणि त्यांची पक्षात प्रचंड घुसमट होत होती, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात होते हे सत्य आहे,” असे मोठे विधान महादेव जानकर यांनी केले आहे. नेमका वाद आणि पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय होता? दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी असा खळबळजनक दावा केला होता की, “गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांच्या प्रवेशाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘ग्रीन सिग्नल’ही दिला होता. मात्र, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा या पक्षप्रवेशाला विरोध होता, त्यामुळे हा प्रवेश टळला.” मात्र, या दाव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चव्हाण यांनी यू-टर्न घेत म्हटले की, “माझे विधान थोडे चुकले. संसदीय परंपरेप्रमाणे पक्षात कोणाला घ्यायचे, याचे अधिकार पक्षाध्यक्षांचे असतात; पण मंत्री कोणाला करायचे, याचे अधिकार पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे असतात.” महादेव जानकरांनी काय गौप्यस्फोट केला? पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानावर माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी दुजोरा देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जानकर म्हणाले, “त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांचे काँग्रेसबरोबर बोलणे चालू होते. ते भाजपच्या जाचाला कंटाळले होते आणि त्यांची पक्षात घुसमट होत चालली होती, हे सत्य आहे. त्यांची भाजपवर मोठी नाराजी होती.” “मुंडे साहेब खरोखरच जाणार होते की नाही, याबद्दल मी 100 टक्के सांगू शकत नाही. कारण सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही आणि मी त्या मीटिंगलाही नव्हतो. पण साहेब परेशान होते, हे नक्की.” चव्हाणांच्या विधानावर मत मांडताना जानकर म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे एक चांगले नेते आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. पण गोपीनाथ मुंडे आता हयात नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर त्यांच्यावर आता चर्चा किंवा डायलॉग करणे हे मला व्यक्तिगतरीत्या योग्य वाटत नाही.” मुंडे साहेब पितृतुल्य होते जानकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणीही शेअर केल्या. “त्यावेळी साहेबांचे आणि माझे संबंध एवढे जवळचे नव्हते. पण मुंडे साहेब मला पितृतुल्य होते, त्यांनी मला मुलासारखेच मानले होते. त्यामुळे मला त्यांचा आदरच आहे. आता जर-तरच्या गोष्टींवर मला अधिक काही सांगता येणार नाही,” असेही जानकर यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता थेट महादेव जानकर यांनीच ‘मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते’ असे विधान केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणि भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप आणखी तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा… भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे!:नाशिकच्या दुर्दशेवरून संजय राऊतांचे सरकारला सवाल- नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमध्ये पडून झालेल्या मृत्यूंच्या सत्रावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. “नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे आमदार एकत्र टाकता येतील,” असा शेलक्या शब्दांतील टोला राऊत यांनी लगावला. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी मखमलाबादसह इतर भागांतील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून सरकारवर हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होते:पृथ्वीराज चव्हाणांनंतर महादेव जानकरांचा खळबळजनक खुलासा