Headlines

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा दिमाखात पारितोषिक वितरण सोहळा:गिरीश महाजनांनी दिला ‘सुराज्या’चा मंत्र




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे मत व्यक्त केले. गणेशोत्सव साजरा करताना लाऊडस्पीकरचे नियम, शाडू मातीचा वापर आणि पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सहा पोलीस आयुक्त संजय दराडे, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. हडपसरमधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय, अरण्येश्वर तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळ ट्रस्टने तृतीय, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अनेक उत्सव साजरे करताना डीजेचा वापर वाढला आहे आणि तरुणांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरुणाई भरकटत आहे की काय, अशी चिंता वाटत असताना, त्यांनी प्रत्येक उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. उत्सवातील लाऊडस्पीकरचे नियम पोलीस नव्हे, तर सर्वोच्च न्यायालय ठरवते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार करून उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. आमदार हेमंत रासने यांनी यावेळी बोलताना सांगितले की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट उत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम करत आहे. पोलिसांनी उत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. केवळ दरडावून चालणार नाही, तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत सुरुवातीला चर्चा होते, पण हा केवळ मिरवणुकीचा उत्सव नसून दहा दिवसांचा आहे. धर्म, संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी उत्सव महत्त्वाचा आहे, त्यामुळे उत्सवात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *