Headlines

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची 15 लाखांची फसवणूक:कोथरूड, नांदेड सिटी, बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल




पुण्यात सायबर चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची 15 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड, नांदेड सिटी आणि बाणेर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन 5 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी गॅस कंपनीतून बोलत असल्याचे भासवून, थकीत बिलाच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर एक एपीके फाइल पाठवून ती उघडताच खात्यातून पैसे काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कारोटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या एका 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने 4 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी बँकेकडून पेन्शन कार्ड मिळणार असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्यांनी खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वर्ग केले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत या घटनेचा तपास करत आहेत. बाणेर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी एपीके फाइल पाठवून 5 लाख 51 हजार रुपयांना गंडा घातला. ही फाइल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक एस. खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून आणि ज्येष्ठ नागरिक आणि महिला याला बळी पडताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सायबर सुरक्षा बाबत जागरूकता बाळगणे आवश्यक असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *