![]()
पंढरपूर शहरात रविवारी एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रभर या प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. संबंधित तरुणीवर कोणताही प्रकारचा हल्ला झाला नसून, या तरुणीने स्वतःच ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून तसेच वैयक्तिक कारणातून घडला आहे. संबंधित तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव या तरुणीने रचला होता. ॲसिड हल्ला प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने सूत्रे हलवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तरुणीच्या जबाबातील विसंगती शोधून काढल्याने या बनावाचा पर्दाफाश झाला असून, अखेर चौकशीदरम्यान तरुणीने स्वतःच हा कृत्य केल्याची कबुली दिली आहे. घटनेची पोलिसांनी दिली माहिती पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, या घटनेबाबत काल आम्हाला पिडीत तरुणी आणि तिच्या आईने आम्हाला तिच्यावरती अज्ञाताने ॲसिड हल्ला केला असल्याचे सांगितले. घटनेनंतर तरुणीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आम्ही तपास करत परिसरातील सीसीटिव्ही तपासले त्यानंतर जबाब नोंदवले, यावेळी आम्हाला तरुणीच्या जबाबात तफावत आढळली, त्यानंतर तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. तिने स्वतःच ॲसिड अंगावर ओतून घेतले पुढे पोलिसांनी सांगितले की, चौकशीत ही सर्व माहिती समोर आली आहे, तिने आपल्या उजव्या बाजुला चेहऱ्यावर हे ॲसिड टाकले. 60 रुपयांना हे ॲसिड कोणत्याही दुकांनामध्ये मिळते, आपण ते बाथरूम टॉयलेट धुण्यासाठी वापरतो. ते तिने एका दुकानातून विकत घेतले आणि जिथे सीसीटीव्ही नाही, रहदारी नाही, गल्लीबोळ आहे, त्या ठिकाणी तिने स्वतःच अंगावर ओतून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मानसिक तणावातून उचलले पाऊल निर्भया पथकाच्या पीएसआय, डॉक्टर आणि स्वतःच्या आईसमोर दिलेल्या व्हिडीओ निवेदनात संबंधित तरुणीने स्वतःच्या कृत्याची कबुली दिली असून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लिव्हरच्या आजारामुळे आणि त्यावरून घरातून मिळणाऱ्या टोमण्यांमुळे आलेल्या मानसिक तणावातून आपण हे पाऊल उचलल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तरुणीच्या आईनेदेखील तिला मानसिक त्रास होत असल्याच्या बाबीला सहमती दर्शवली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. ॲसिड डोळ्यांत गेल्याने त्रास झाला असला तरी शरीरावर अन्य जखमा नाहीत, मात्र याबाबतचा अधिकृत वैद्यकीय अहवाल येणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी बोलावले असून, पुढील कायदेशीर तपास सुरू असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Source link
पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट!:तरुणीनेच रचला हल्ल्याचा बनाव, पोलिसांनी रात्रीतून लावला प्रकरणाचा छडा