Headlines

CBSE शाळांकडून पुस्तकांची सक्ती खपवून घेतली जाणार नाही:तक्रार आल्यास कारवाई, देखरेखीसाठी समिती स्थापन होणार – शिक्षणमंत्री दादा भुसे




राज्यातील खासगी आणि CBSE संलग्न शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केल्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारची सक्ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडली. याचबरोबर, अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात केली. पालकांची लूट थांबवण्यासाठी सरकारची भूमिका राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर अनेक खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तके आणि शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शाळांमध्ये विकल्या जाणाऱ्या वह्या आणि पुस्तकांच्या किंमती बाजारपेठेतील दरांपेक्षा जास्त असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, शासनाने कोणत्याही शाळेला विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्याची परवानगी दिलेली नाही. तक्रार मिळाल्यास थेट कारवाई सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात दादा भुसे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल. काही शाळांना याप्रकरणी आधीच नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती खासगी शाळांकडून होणाऱ्या कथित आर्थिक लुटीबाबत विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अशा शाळांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ही समिती नेमकी कधी कार्यान्वित होणार आणि तिच्यामार्फत कितपत प्रभावी कारवाई होणार, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे. बोर्ड परीक्षेतील गैरप्रकारांवरही सरकारचा चाबूक दरम्यान, यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षांमधील सामूहिक कॉपी आणि इतर गैरप्रकारांवरही सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. दादा भुसे यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड परीक्षांतील गैरप्रकारांमुळे १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सामूहिक कॉपीची एकूण १,४६९ प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी अमरावती विभागात सर्वाधिक ६५०, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ५०१ प्रकरणे आढळली. बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकारांप्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ८, नागपूर विभागात ३, छत्रपती संभाजीनगर विभागात ३ आणि लातूर विभागात १ गुन्ह्याची नोंद झाली आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे आणखी कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *