![]()
दौंड तालुक्यातील खामगाव येथे अमानुष घटना उघडकीस आली आहे. एका 23 वर्षीय परप्रांतीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचा मृतदेह कारच्या डिकीत टाकून वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक नेहमीचा रस्ते अपघात असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता, मात्र यवत पोलिसांच्या सखोल तपासामुळे आरोपींचा हा डाव पुरता फसला असून पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह 5 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रामू शंभू पासी (वय 23, मूळ रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) हा तरुण गेल्या एप्रिल 2026 पासून खामगाव येथील ‘गाडीमोड’ परिसरातील एका गुऱ्हाळावर मजूर म्हणून कामाला होता. 19 जूनच्या मध्यरात्री गुऱ्हाळाच्या आवारात जेसीबी चालवून काही कामे केली जात होती. यावेळी चालक आलम याने बेजबाबदारपणे जेसीबी चालवला. गुऱ्हाळाच्या आवारातच झोपलेल्या रामू पासीच्या अंगावरून थेट जेसीबी गेल्याने त्याचा जागीच वेदनादायक अंत झाला. जेबीसी चालकाकडून धमकी जेसीबी मालकाने गुऱ्हाळावरील इतर मजुरांना या घटनेबाबत तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत कोंबला आणि पहाटेच्या सुमारास तो वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. हा अज्ञात वाहनाने उडवल्याचा प्रकार असावा असा पोलिसांचा आणि नागरिकांचा समज व्हावा या उद्देशाने हा संपूर्ण बनाव रचण्यात आला होता. दरम्यान, रामू अचानक गायब झाल्याचे कंत्राटदार तमेरेज फरीदी यांनी त्याच्या उत्तर प्रदेशातील कुटुंबीयांना फोन करून सांगितले. भावाच्या बेपत्ता होण्याची बातमी समजताच त्याचा मोठा भाऊ राजू पासी हा तातडीने दौंडमध्ये दाखल झाला. दोन दिवस त्याने भावाचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर 21 जून रोजी तो खामगाव येथील गुऱ्हाळावर चौकशीसाठी गेला असता, तिथल्या व्यवस्थापक आणि लोकांच्या संशयास्पद वागणुकीवरून त्याला तीव्र संशय आला. राजूने तात्काळ यवत पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे मदतीची याचना केली. 5 दिवसांची पोलिस कोठडी यवत पोलिसांनी राजू पासी याच्या तक्रारीची दखल घेत गुऱ्हाळावर जाऊन सखोल चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच आरोपींची भंबेरी उडाली आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मृत मजुराच्या भावाच्या तक्रारीवरून जेसीबी मालक अविनाश बाळासाहेब यादव, गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि चालक आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर अपघाताची माहिती पोलिसांपासून दडवून ठेवून पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी गुऱ्हाळ मालक नाथाजी कोळपे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलिसकरत आहेत.
Source link
दौंडमध्ये क्रूरतेचा कळस:जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव, 5 जणांवर गुन्हा दाखल