Headlines

बिश्नोई गँगचा सदस्य राजस्थानमधून गजाआड:पुणे खंडणी आणि गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेची मोठी कारवाई




पुणे पोलिसांनी मंतरवाडी गोळीबार आणि 5 कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने राजस्थानमधून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आहे. पवन राम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानमधील हनुमानगड येथून पवन रामला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पुण्यातील व्यापारी वर्गात पसरलेले भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे. फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथील ‘एच विकास स्टील’ या गोदामाच्या मालकाकडे बिश्नोई गँगने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीसाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने ही घटना घडली. दोन आठवड्यांपूर्वी जून महिन्याच्या उत्तरार्धात बिश्नोई गँगच्या दोन साथीदारांनी दुचाकीवरून येऊन गोदामाबाहेर हवेत चार राऊंड गोळीबार केला होता. विशेष म्हणजे, स्टील व्यावसायिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत असतानाच हा गोळीबार करण्यात आला होता. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिस आणि गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचे लोकेशन राजस्थानमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलिस पवन रामची कसून चौकशी करत असून, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. अशा संघटित गुन्हेगारीविरुद्ध पोलिस मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *