![]()
लघु पाटबंधारे विभागाच्या कामासाठी शासनाकडे जमा करावयाच्या अनामत रकमेची बनावट बँक चलने सादर करून जिल्हा परिषदेची ३ लाख ९० हजार १७० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उंबर्डे (ता. खटाव) येथील नरसिंह मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुणकुमार दिलपाक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नागाचे कुमठे (ता. खटाव) येथील साठवण बंधाऱ्याच्या सुमारे १९.९३ लाख रुपयांच्या कामाची निविदा संबंधित संस्थेला मंजूर झाली होती. नियमानुसार काम सुरू करण्यापूर्वी शासनाकडे अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक होते. संस्थेने जिल्हा बँकेत अनामत रक्कम भरल्याची चलने विभागाकडे सादर केली होती. मात्र, पडताळणीदरम्यान ही चलने बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेची ३ लाख ९० हजार १७० रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला अधिकारी जैस्वाल करत आहेत. मल्हारपेठेतील २० वर्षीय युवती बेपत्ता मल्हारपेठ परिसरातील तनुष्का गजानन शिंदे (वय २०) ही गुरुवारी घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्यानंतर बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा ठावठिकाणा न लागल्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला कर्मचारी पाटील करत आहेत. घरात पडून जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू चिंचणेर निंब (ता. सातारा) येथील गणपती किर्दत (वय ८१) यांचा घरात घसरून पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास महिला कर्मचारी गायकवाड करत आहेत. पाटखळमधून सौरऊर्जेवरील मोटार लंपास पाटखळ (ता. सातारा) येथील घमांडे शिवारातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची सौरऊर्जेवर चालणारी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी शिवाजी नारायण शिंदे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास हवालदार वायदंडे करत आहेत. परवान्याविना सावकारी; सराफाविरुद्ध गुन्हा दाखल वैध परवाना नसताना खासगी सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी शनिवार पेठेतील जयभवानी ज्वेलर्सचे गजेंद्रसिंह नरपतसिंह देवल यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, एका व्यक्तीने सोने गहाण ठेवून २ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावर दरमहा दोन टक्के व्याज आकारले जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर नियुक्त पथकांनी दुकान व घराची झडती घेऊन आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असलेल्या डायऱ्या जप्त केल्या. तपासात देवल यांच्याकडे सावकारीचा वैध परवाना नसल्याचे आढळून आले. सहायक निबंधक राहुल अशोकराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास हवालदार देशमुख करत आहेत.
Source link
बनावट अनामत चलनांचा वापर:सातारा जिल्हा परिषदेला 3.90 लाखांचा गंडा, मजूर सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा